वाडा : वाडा कोलम या भाताच्या वाणामुळे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या वाड्याला गेल्या काही वर्षांपासून ‘फटाक्यांचे शहर’ अशीही नवी ओळख मिळाली असून येथे फटाक्यांची मोठी उलाढाल होत असते. या वर्षी कोरोनाचे संकट असतानाही व्यापाऱ्यांनी फटाक्यांचा माल भरून दुकाने काही महिन्यांपासून सुरू केली होती. मात्र, फटाके परवाना नूतनीकरण न केल्याने वाडा पोलिसांनी फटाका दुकानांवर धाडी टाकून दुकाने बंद केली आहेत. या धाडसत्रामुळे फटाके व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, मुंबई या जिल्ह्यांत फटाक्यांचे घाऊक आणि किरकोळ विक्रेते असूनही वाड्यातील फटाके व्यापाऱ्यांकडील वाजवी दरामुळे विक्रेत्यांचा ओढा वाड्याकडेच आहे. वाडा शहरात प्रीतम सेल्स एजन्सी, दिलीप ट्रेडर्स, मनोरे ट्रेडर्स, सिद्धिविनायक ट्रेडर्स, पातकर ट्रेडर्स, नंदकुमार ट्रेडर्स आदी घाऊक फटाक्यांची दुकाने असून दिवाळीच्या वेळेस ही दुकाने रात्रंदिवस सुरू असतात. या दुकानांत मालकासह काही कर्मचारी रात्रंदिवस काम करतात. घाऊक व्यापारी व किरकोळ विक्रेते यांनी दुकानात गर्दी केल्याचे दिसून येते. पहिले काही दिवस हे घाऊक विक्रेते व दिवाळीच्या पाचसहा दिवस अगोदर घरगुती ग्राहक यांची खरेदीसाठी झुंबड असलेली पाहावयास मिळते.
परवाना नूतनीकरण न केल्याने वाड्यातील फटाका दुकाने बंद, वाडा पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 11:21 PM