विक्रमगड : तालुक्यातील बहुतेक ठिकणची भात कापणीची कामे संपली असून भातामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण निर्माण होत असते. परंतु आता थंडीचे दिवस आले असल्याने विक्रमगड तालुक्यात बोचऱ्या थंडीने शिरगाव केला आहे. तसेच दिवस लहान असल्याने रात्र लवकर होते आणि सकाळही लवकर होते. त्यामुळे तालुक्यातील घरांच्या खिडक्या व दरवाजे सकाळी उशिरापर्यंत तर संध्याकाळी लवकरच बंद होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून विक्रमगड परिसरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. दिवसभर देखील हवेत अंगावर रोमांच आणणारा गारवा जाणवतो आहे. तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीची सरासरी वाढल्याने तापमानात घट झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. थंडीमुळे तालुक्यातील दैनंदिन व्यवहार सकाळी उशिराने सुरू होऊन सायंकाळी लवकर बंद केले जात आहेत. रात्री ८ वाजल्यानंतर तालुक्यातील रस्ते सुनसान होत आहेत. तर जंगलपट्टी भागात तर सायंकाळी ६ वाजताच घराची दारे खिडक्या बंद केली जात आहेत.
थंडीपासून बचाव करण्यासाठी लहान मुले, स्त्रिया, पुरुष तसेच वृद्ध असे सारेच दिवसादेखील गरम कपडे परिधान करीत आहेत. थंडीमुळे पाण्याचा तापमानात मोठी घट झाली असल्याने सकाळी उठल्यावर तोंड धुण्यासाठी अथवा सायंकाळीही पाणी गरम करून घ्यावे लागते. तालुक्यातील ग्रामीण भागात सायंकाळी मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटवलेल्या दिसतात. त्यामुळे थंडीची तीव्रता अजूनही किती वाढणार आहे, याचा अंदाज बांधता येत नाही. कारण आताच तर थंडीला सुरु वात झाली आहे. बरीचशी मंडळी निसर्गातील वातावरणाचा आनंद लुटताना दिसतात. तर काहीजण सध्याच्या वातावरणाशी जुळवून घेत आहेत.