लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारमध्ये राहणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याच्या घरावर सोमवारी भल्या पहाटे गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबिन शेख (४३) असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच विरार व गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस घटनास्थळी पोहचले असून नेमका हा गोळीबार कोणी व का केला याचा शोध घेत हल्लेखोरांचा तपास करत आहे. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विरारच्या गोपचार पाडा येथील आशियाना अपार्टमेंट मध्ये मोबिन शेख (४३) हा आपल्या परिवारासह राहतो. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मोबिन यांच्या घराचा दरवाजा कुणीतरी ठोठावला पण त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी घराच्या खिडकीतून गोळी झाडली. मात्र झाडलेली गोळी खिडकीतून भिंतीला लागली. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत. मोबीन शेख हा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्याच्यावर यापूर्वी देखील ॲसिड हल्ला झाला होता. ही फायरिंग आपसातील वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.