नालासोपारा - नायगाव वाकीपाड्यात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास जमिनीच्या वादातून दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. आरोपीने केलेल्या तीन राउंड फायरिंगमध्ये सात जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयांत दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बापाणेतील जमिनीवरून मेघराज भोईर यांचा हाउसिंग एल. एल. पी. ग्रुपसोबत वाद होता. मंगळवारी मेघराज भोईर आणि एल. एल. पी. ग्रुपसोबत वादाची ठिणगी पडली होती. त्यावेळी मेघराज यांनी बंदूक काढली होती. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला होता. बुधवारी दुपारी जमिनीच्या पंचनाम्यासाठी महसूल अधिकारी, कर्मचारी आले होते. पंचनाम्यानंतर दुपारी मेघराज भोईर आणि एल. एल. पी. ग्रुपसोबत पुन्हा वाद झाला.
दोन्ही गटांत वाद झाल्यानंतर मेघराज यांनी शिकारीच्या बंदुकीतून तीन राउंड फायर केल्या. गोळीबारात जखमी झालेल्यांच्या खांदे, मांडीत व हातात गोळी लागली आहे. संजय जोशी, अनिश सिंग, शुभम दुबे, वीरेंद्र चौबे, वैकुंठ पांडे, संजय राठोड व राजन सिंग अशी जखमींची नावे आहेत. तीन जण गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी मेघराजसह पाच आरोपींना नायगाव पोलिसांनी अटक केली आहे.