लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : मुंबई वडोदरा व्हाया पनवेल हा महामार्ग पालघर व ठाणे जिल्ह्यातून जात असून या संदर्भात वाडा पंचायत समितीच्या प्रशिक्षण सभागृहात बुधवारी सायंकाळी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी मोहन नळंदकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी कल्याणकारी संघटनेने आधी नुकसानभरपाई निश्चित करा मगच सर्वेक्षण करू देऊ अन्यथा नाही असा इशारा दिला. या मार्गासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. या मार्गात ठाणे व पालघर जिल्हयÞातील अनेक शेतकरी भूमिहीन व बेघर होणार आहेत. त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकरी कल्याणकारी संघटनेची स्थापना करण्यात आली असून तिच्या झेंड्याखाली शेतकरी एकवटले आहेत. बुधवारी वाड्याचे उपविभागीय अधिकारी मोहन नळंदकर यांनी बाधित शेतकऱ््यांची बैठक पंचायत समितीच्या प्रशिक्षण सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. महामार्गामुळे अनेक जण बेघर होणार तर काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. बाजारहाटीचे मार्ग बंद होणार असून शेतकऱ्यांच्या शेतीवर जाण्याचे मार्गही बंद होऊन त्यांना फेरा मारून शेतावर जावे लागणार आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या कूपनलिका , विहीरी उध्वस्त होणार आहेत. अशा अनेक समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या. त्याबाबत शासनाला कळविले जाईल, असे नळंदकर यांनी सांगितले. जोपर्यंत नुकसानभरपाई निश्चित करीत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्वेक्षण करून देणार नाही. शासन जबरदस्ती करीत असेल तर तशा पध्दतीने उत्तर दिले जाईल असा इशारा शेतकरी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा भोईर यांनी बैठकीत दिला. या बैठकीस तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे सह महामार्गाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. आता शासन कोणती भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आधी नुकसानभरपाई, मगच सर्वेक्षण
By admin | Published: June 30, 2017 2:36 AM