जव्हार : तालुक्यापासून ३६ कि.मी. अंतरावर असलेल्या ओझर कुंडाचापाड्यात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा बस पोहचली आहे. पहिल्यांदा बससेवा सुरु झाल्याने ग्रामस्थ आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असून, ग्रामस्थांनी एसटी महामंडळाचे आभार मानले आहेत. कुंडाच्यापाड्यात पहिल्यांदा आलेल्या चालक वाचकांचे अभिनंदन करून बसला फुलांची माळ, हार घालून बस सजवली तसेच नारळ फोडून पूजा केली.
तालुक्यातील ओझर कुंडाचापाडा हुबरण, पेरणआंबा तसेच डहाणू तालुक्याला लागून असलेली दुर्गम भागातील काही गावंपाडे यांना बसमुळे मोठा आधार मिळाला आहे. तसेच, या गावांना वर्षूनवर्ष येथील प्रवाशांना खाजगी जीप शिवाय इतर प्रवाशाचे कुठलेही साधन नव्हते. त्यामुळे या भागातील नागरिकांना विविध कामांसाठी तालुक्याला जाण्यासाठी दमछाक होत असे. तसेच बस पकडायती असल्यास मेढा येथे जावे लागत होते. त्यासाठी ७ कि.मी. पायपीट करावी लागत होती.
ओझर कुंडाचापाडा ही नवीन सेवा सुरु केल्याने या भागातील नागरिकांचा प्रवासाची अडचण दूर झाली आहे. त्यातच विद्यार्थ्यांना कॉलेज व शाळेत जाणेही सोपे झाल्याचे नागरिकांनी सांगितले. या भागात खाजगी जीप द्वारे वडाप वाहतूक होते परंतु त्यांचा मनमानी कारभार असतो. बस ही वेळेत येणारच त्यामुळे येथील नागरिकांची तालुक्याला व अन्य ठिकाणी जाण्यासाठी होणारी कुचंबना थांबणार आहे. ही बससेवा सुरु व्हावी, म्हणून येथील ग्रामस्थ सुभाष डोके व अन्य ग्रामस्थांनी पाठपुरावा ठेवला होता. मात्र, अखेर स्वातंत्र्यनंतर पहिल्यांदा ओझर कुंडाचापाडयाला बस पोहचली आहे. तसेच बस सुरु झाली त्यावेळी कुंडाचापाड्याातील सीताराम गरेल, वसंत भोवर, पांडू भोवर, राजेश पाटारे, शंकर वनगा, लखमा पाटारे, बच्चू दिवा व अन्य गावकरी महिलावर्ग व विद्यार्थी उपस्थित राहून बस चालक वाचकांचे अभिनंदन केले.ओझर कुंडाचापाडा येथील ग्रामस्थांनी एसटी कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.