लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : तलासरी पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद झाई मराठी केंद्रशाळेने तंबाखूमुक्त अभियानाचे सर्व नऊ निकष पूर्ण केले असून पालघर जिल्ह्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा होण्याचा बहुमान पटकावला आहे. यामुळे सीमाभागातील या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी ही माहिती दिली. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला. तलासरी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, महाविद्यालयात तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात आले आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची एकदिवसीय ऑनलाइन मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली होती.
यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप आणि तलासरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुतार यांनी सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जि.प. झाई शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत ईशी यांनी तंबाखूमुक्त शाळांचे सर्व नऊ निकष पूर्ण केले. सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक जयेश माळी, महाराष्ट्र राज्याचे नशाबंदी मंडळ प्रतिनिधी व पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील, झाई केंद्रप्रमुख अकबर शेख, पारूल चितलीया यांचे उपक्रमाला मार्गदर्शन लाभले. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तची शपथ देण्यात आली.