लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - काशिमीरा भागातील मीरा गावठाण मधील गायत्री सोसायटीत राहणारे राकेश धीरूभाई हरसोरा ( 47 ) यांचा बुधवारी नाल्यात बुडून मृत्यू झाला . तर वाहून जाणाऱ्या एकाला स्थानिकांनी वाचवले .
संजयगांधी राष्ट्रीय उद्यानाला खेटून मीरा गावठाण - महाजनवाडीत डोंगरावरून पाण्याचा मोठा लोंढा येत असतो . सोमवार रात्री पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी असलेली मोठ्या नाल्याची भिंत बुधवारी कोसळली व रस्ता खचला आहे.
येथील बैठ्या चाळीं मध्ये पाणी शिरले आहे . दोन दिवस घरात पाणी साचून असल्याने वीज पुरवठा खंडित केला गेला आहे. घरातील सामान आदी सर्व पाण्यात गेले आहे. जेवण बनवणे सुद्धा शक्य होत नसल्याचे रहिवाश्यांनी सांगितले.
बुधवारी सकाळी देखील दोन रिक्षा आणि दुचाकी पाण्याच्या वेगामुळे नाल्यात वाहून गेल्या . तर वाहून जाणारी गाडी पकडण्यासाठी धावलेले राकेश हरसोरा देखील नाल्यात वाहून गेले . त्यांचा मृतदेह नंतर पुढच्या भागात आढळून आला . तर नाल्यात वाहून जाणाऱ्या एकास रहिवाश्यांनी वाचवले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लगत सरकारी जागेत या चाळी मोठ्या संख्येने बांधण्यात आल्या असून २००५ सालच्या प्रलय वेळी पाण्याच्या लोंढ्यात खोल्या कोसळून त्यावेळी अनेकांचा जीव गेला होता . दरवर्षी मुसळधार पावसात येथील रहिवाश्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो .