वसंत भोईर / वाडाभिवंडी वाडा मनोर या खड्डेमय महामार्गावर आज श्रमजीवी संघटनेने उपरोधक आंदोलन केले. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात मत्स्यबीज सोडले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सुप्रीम ने अधिकारी यांच्या हस्तेच खड्ड्याजवळ नाराळ फोडून त्यांच्याच हस्ते मासे सोडण्यात आले. आंदोलन संघर्ष न करता केलेल्या या अभिनव आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले.बीओटी तत्वावर बनवलेला भिवंडी वाडा मनोर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात नादुरु स्ती झाली आहे. याबाबत यापूर्वी देखील अनेक आंदोलने झाली अनेकदा संघर्ष झाला. अनेक नियम धाब्यावर बसवून सुप्रीम नामक कंपनीने हा रस्ता बनवला आहे. आणि त्या बदल्यात ही कंपनी या महामार्गावर २ ठिकाणी टोल वसूल करत आहे. मात्र, रस्त्याची आवश्यक ती डागडुजी वेळेवर करत नाही. परिणामी गेल्या दोन वर्षात शेकडो अपघात झाले असून सव्वाशे पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत वारंवार होणाऱ्या आंदोलनानंतर देखील बेजबाबदार वागणाऱ्या सुप्रीम कंपनी आणि सर्वजनिक बांधकाम विभागाला आज हे उपरोधात्मक आंदोलन करून श्रमजीवी संघटनेने चांगलाच दणका दिला. कुडूस ते वाडा परिसरातील रस्त्यातील खड्ड्यामध्ये मासे सोडण्यात आले. विशेष म्हणजे या खड्ड्यांचे औक्षण करून ठेकेदार सुप्रीम आणि सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून त्यांच्याच हस्ते मासे सोडण्यात आले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, तालुका अध्यक्ष मिलिंद थुले, सचिव सरीता जाधव, मनोज काशीद, कल्पेश जाधव, प्रवीण जाधव, राजू जाधव इत्यादी कार्यकर्ते होते. तर पोलीस उपनिरीक्षक चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाच्छापूरे, शेटे आणि सुप्रीम चे शेख उपस्थित होते. सुप्रीम कंपनीला आठ दिवसांची डेडलाईन देण्यात आली आहे.
महामार्गातील खड्ड्यांमध्ये सोडले मत्स्यबीज
By admin | Published: October 11, 2016 2:38 AM