-हितेंद्र नाईकपालघर: पालघर जिल्ह्यातील सातपाटी ह्या प्रसिद्ध मासेमारी बंदरातील एका मच्छीमाराला मासेमारी करताना दोन तोंडे असलेल्या शार्क माश्याचे 6 ते 8 इंच लांबीचे पिल्लू मिळाले. मोबाईल मध्ये काढलेले फोटो सर्वत्र व्हायरल झाल्याने सर्वांचा हा विषय औत्सुक्याचा बनला आहे.
धी सातपाटी मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्थेचे सभासद असलेले नितीन पाटील हे आपली "जलतारा"ही बोट घेऊन समुद्रात मासेमारी ला गेले होते.खोल समुद्रात 70 नॉटिकल समुद्री क्षेत्रात "दालदा" पद्धतीने मासेमारी करीत असताना बुधवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या जाळ्यात शार्क(मुशी) माश्याचे दोन डोके असलेले पिल्लू मिळून आले.त्यांच्या जाळ्यात अनेक शार्क ची लहान मोठी पिल्ले आल्याने त्याकडे कुणाचेही विशेष लक्ष गेले नाही.
दुसऱ्या दिवशी बोटीची अंतर्गत साफसफाई करीत असताना एका आदिवासी खलाशी कामगाराला ते शार्क चे पिल्लू मृतावस्थेत पडलेले दिसून आले. त्यानेही प्रथमच दोन तोंडे असलेला मासा बघितल्याने त्याने आपला मालक नितीन पाटील ह्याला दाखवले. त्यानेही आपल्या 20 वर्ष्याच्या कारकिर्दीत प्रथमच असा दोन तोंडाचा मासा आपण पाहिल्याचे लोकमत ला सांगितले.त्याने ही घटना आपल्या बोटीत असलेल्या वायरलेस सेट द्वारा आपल्या इतर सहकाऱ्यांना सांगितले.त्यांनी त्या माश्याला देवत्वाचे रूप मानून पुन्हा समुद्रात सोडून देण्याचा सल्ला दिला.
सीएमएफआरआय वैज्ञानिक आणि इतर सागरी जीवशास्त्रज्ञांनी पुष्टी केली की हे अत्यंत दुर्मिळ अशी घटना असल्याचे सांगितले.सिएमएफ आर आय च्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार दोन डोक्याचा शार्क फारच कमी प्रमाणात आढळत असून मुंबई,पालघर जिल्ह्यात असा मासा मिळणे बहुदा पहिलीच घटना असावी.कोणत्याही भ्रुण विकृतीमुळे, विकारांमुळे हे अत्यंत दुर्मिळ असे पिल्लू जन्माला आले असावे.असे मासे वैज्ञानिक हिताच्या दृष्टीने जतन करणे महत्वाचे ठरले असते.मात्र आता ते समुद्रात फेकून दिल्याने ह्या दोन तोंडे असलेल्या शार्कच्या जन्माचे रहस्य उलगडण्यास मदत होऊ शकली असती.