आशीष राणेवसई : मच्छी खाणाऱ्या खवय्यांसाठी पापलेट मासा हवा असतो, मात्र अलीकडे समुद्रात पापलेट दिसेनासे झाले आहे. मेहनत करूनही मोठ्या पापलेटच्या तुलनेत केवळ छोटी पापलेट जाळ्यात अडकू लागल्याने मच्छीमार हवालदिल झाले असून आर्थिक चिंतेत अडकले आहेत.
मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच वादळे, अतिवृष्टी, खराब हवामान, अवकाळी पाऊस आदीबाबतीत मासळीचे भाव गडगडले. त्यामुळे समस्त मच्छीमार समाजात निराशा पसरली असताना त्यात मोठे उत्पन्न देणाºया मासळीच्या दुर्भिक्ष्यामुळे मच्छी दुष्काळाचे संकट किनारपट्टीवर घोंगावू लागले आहे. दरम्यान, नव्या हंगामाच्या पहिल्या चार महिन्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणारे मोठे पापलेट आता समुद्रात मिळेनासे झाले आहे. मच्छीमार बांधव सांगतात की, छोट्या पापलेटला बाजारात भाव मिळत नसल्यामुळे मच्छीमारांचे अर्थकारण कोलमडले आहे.
पावसाळी मासेमारी बंदीनंतर गतवर्षी आॅगस्ट महिन्यात मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरु वात झाली. हंगामाच्या सुरुवातीपासूनच ते साधारणत: नोव्हेंबरपर्यंत सुपर, एक नंबर, दोन नंबर अशा प्रतवारीतील मोठ्या आकाराचे पापलेट पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात. त्यातून मच्छीमारांना चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे पहिल्याच हंगामात जास्तीत जास्त मोठे पापलेट मिळवूनत्याद्वारे मिळणाºया उत्पन्नातून वर्षभरातील खर्चाची बेगमी करण्याचे मच्छीमारांचे प्रयत्न असतात. मात्र डिसेंबरपर्यंत मोठे पापलेट मिळेल या भरवशावर राहिलेल्या मच्छीमारांना या वेळी अगदी छोट्या आकाराची पापलेट जाळ्यात मिळत आहेत. आज वसई, नायगाव व अर्नाळा आदी ठिकाणी घाऊक मासळी बाजारात विक्र ीसाठी येणाºया मासळीमध्ये मोठे पापलेट खूपच कमी आणि छोट्या आकाराच्या पापलेटचे प्रमाण जास्त दिसून येते. परंतु या छोट्या पापलेटला अपेक्षित भाव मिळत नसल्याने बºयाच वेळेला मिळेल त्या भावात या माशांची विक्री करावी लागत आहे.मच्छीच्या वाढीस पुरेसा वेळ मिळावामासळीच्या वाढीला पुरेसा वेळ दिला जात नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून १५ मे ते १५ आॅगस्ट अशी तीन महिने मासेमारी बंद ठेवण्याची मागणी मच्छीमारांनी शासनाकडे केली आहे, मात्र या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार करीत आहेत.