मीरारोड - वाढवण बंदरचे भूमिपूजन ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना दुसरीकडे त्या निषेधार्थ भाईंदरच्या उत्तन - चौक भागात मच्छीमारांनी काळे झेंडे फडकवत आंदोलन केले. वाढवण बंदरमुळे ३० हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित होणार असल्याने मच्छीमारांचा सरकार विरोधातला लढा हा आमच्या अस्तित्वाचा असल्याचे मच्छीमार म्हणाले.
वाढवण बंदरच्या विरोधात शुक्रवारी उत्तन, भुतोडी बंदर व चौक येथे मच्छीमारांनी निदर्शने केली. समुद्रातील बोटींवर सुद्धा मच्छीमारांनी आंदोलन केले. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो, धी डोंगरी चौक फिशरमन सोसायटीचे माजी अध्यक्ष जॉरजी गोविंद, विल्यम गोविंद, उत्तन मच्छिमार व वाहतूक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विंनसंन बांड्या, सचिव बोनावेंचर मालू, अजित गांडोली, अंकलेश कर्तन, आष्टीन नातो, संज्याव पाटील, माल्कंम कर्तन आदींसह मोठया संख्येने मच्छीमारांनी आंदोलनात सहभाग घेतला.
विशेष म्हणजे, उत्तन सागरी पोलिसांनी काही प्रमुख मच्छीमार नेत्यांना सुमारे एक-दीड तास पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवले होते. त्यांना नंतर सोडले असले तरी पोलिसांची पाळत असल्याने मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली. वाढवण बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ६० पेक्षा जास्त मच्छिमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छिमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत. ३० हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित होणार आहे. तरी देखील अदानीसाठी मच्छीमार व स्थानिक भूमीपुत्रांना उध्वस्त करत वाढवण बंदर सत्तेच्या पाशवी बळावर लादण्याची मोगलाई व ब्रिटिश वृत्ती सरकारची दिसत असल्याचा संताप यावेळी मच्छीमारांनी बोलून दाखवला.