- हितेन नाईक
सध्या युनोने देशातील छोटया मच्छीमारांची अन्न, सामाजिक आणि राहणीमान सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिल्याने संयुक्त राष्ट्र संघाने नेमलेल्या आशिया खंडाच्या प्रतिनिधी म्हणून उज्वलाताई पाटील देशभरातील सागरी किनारे पालथे घालत आहेत. वर्षानुवर्षे पासून मासळी मार्केटमध्ये बसणाऱ्या महिलांना त्यांच्या जागांचा हक्क मिळावा, मुंबईच्या विकास आराखडया नंतर रुंदीकरणात जुनी मार्केट जाणार असल्याने आराखडयात मार्केटसाठी जागा मिळावी यासाठी त्या पौर्णिमा मेहेर यांच्यासह झुंजत आहेत.मच्छिच्या दुष्काळापाठोपाठच किनारपट्टीवर धडकणारे विविध प्रकल्प, किनारपट्टीवरच्या बहुमूल्य जागांवर उद्योगपतींचा असणारा डोळा, मच्छीमारांची घरे, जमिनी नावावर करण्याचा प्रश्न, मच्छिमार आणि त्यांच्या व्यवसायावर आलेल्या संकटांना थोपवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या रणरागिणी उज्वला दांडेकर-पाटील देशातील किनारपट्ट्या पालथ्या घालत आहेत. या कर्तृत्वामुळे त्यांची जागतिक अन्न आणि कृषी विषयक संघटनेवर आशियातील मच्छिमार प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.
उज्वला पाटील यांना समाजवादी विचारसरणीचे बाळकडून वडील नारायण दांडेकर यांच्या कडून मिळाले. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उच्चशिक्षित होण्याचा ध्यास घेतलेल्या उज्वलाताईंना मुलगी आहे म्हणून वाणगाव येथील टेक्निकल कॉलेज मध्ये प्रवेश नाकारण्यात आला. परंतु जिद्दीने त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्या नंतर वडराई येथील कान्हा पाटील या गावाच्या पाटलांच्या घरातील जयकिसन पाटील या उच्चशिक्षित तरुणा बरोबर त्यांचा विवाह झाला. काही काळ त्या संसारात रमल्या एनएफएफ या जागतिक मच्छिमार संघटनेचे नेते थॉमस कोचेरी यांच्या आपल्या घरात होणाºया बैठकी मध्ये चर्चिल्या जाणाºया विचारांनी त्या प्रभावित झाल्यात आणि जेष्ठ मच्छिमार नेते आणि सासरे रामभाऊ पाटील यांच्या आग्रहास्तव त्यांनी सन २००९ साली महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या समुद्रात २० जून २०१० मध्ये चित्रा व खिलजिया या जहाजांच्या टक्करीमुळे समुद्रात झालेल्या प्रदूषणामुळे लोकांनी मासे खाऊ नये असे जाहीर करण्यात आले. त्याचा मोठा विपरीत परिणाम मच्छिमार आणि मत्स्यविक्र ेत्या महिलांवर होऊ लागल्याने त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी उज्वला तार्इंनी यशस्वीपणे पार पाडली. शेकडो महिलांचा मोर्चा मुंबई महानगर पालिकेवर नेत त्या महिलांना न्यायही मिळवून दिला.मच्छीमारांच्या समस्या, कायद्यातील तरतुदी यांचा अभ्यास करून मच्छीमारांच्या घरांच्या जागा नावावर करणे (सीमांकन), वहिवाटीच्या जागा आरक्षित करणे ही महत्वपूर्ण कामे कै.रामभाऊ पाटील, विवेकानंद, राजेश मांगेला यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. शासनाच्या सहकार्याने मुंबई विकास आराखड्यात कोळीवाडे आणि वहिवाटीच्या जागाचा समावेश झाला असून त्या मच्छीमारांच्या नावावर होतील, असा ताईंना विश्वास आहे.