(मंगेश कराळे)
नालासोपारा : पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी व दुचाकी चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून पाच गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.
नालासोपाऱ्याच्या नवजीवन येथील साईनिवास बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या समीर अब्दुल हमीद मलिक (४३) यांच्या घरी १६ ऑगस्टला रात्री चोरट्यांनी घराच्या खिडकीची स्लाइडिंग उचकटून दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश करत १५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन चोरी करून नेले होते. १७ ऑगस्टला पेल्हार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. नमुद गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे व मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी अलाउद्दीन अरशद खान (१९), किसन रोहीत शुक्ला (२१), विलास अशोक राजभर (१९), साहिल इस्माईल सय्यद (२४) आणि राहुल सिताराम पटेल (२८) यांना ताब्यात घेवुन तपास केल्यावर त्यांनी सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीकडे अधिक तपास केल्यावर त्यांचेकडून चोरीस गेलेले ७ मोबाईल व एक बजाज कंपनीची पल्सर दुचाकी असा १ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीकडून पेल्हार येथील ४ आणि विनोबा भावे नगर येथील १ गुन्हा असे एकुण ५ गुन्ह्यांची उकल केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पाटील, पोलीस निरीक्षक (प्रशासन) शिवानंद देवकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, रवि वानखेडे, संजय मासाळ, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, सुजय पाटील यांनी केली आहे.