नालासोपारा (मंगेश कराळे) - चोरी, घरफोडी करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून ११ गुन्ह्यांची उकल करून ५ लाख ९२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
चिंचोटी येथील लाईनपाडा परिसरातील मोबाईल रिपेरिंगचे दुकान चोरट्यांनी २७ फेब्रुवारीला फोडण्यात आले होते. चोरट्यांनी दुकानातुन मोबाईल व रोख रक्कम चोरी केली म्हणून सुमित प्रदीप वेखंडे यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. नमुद गुन्हयाचे तपासाचे अनुषगांने गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाव्दारे प्राप्त माहितीच्या आधारे वालीवचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयांचा तपास करुन आरोपी राजेशकुमार देवेंद्र ठाकुर (२८), राज राधेश्याम सिंग (२५), रकीऊल मंन्टु शेख (२४), श्याम उत्तम राठोड (४०) आणि फकरु मोहम्मद अली शेख (४७) यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयातील चोरीस गेलेले मोबाईल, रोख रक्कम तसेच ११ गुन्ह्यांची उकल करून ५ लाख ९२ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलींद साबळे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, सचिन मोहीते, सचिन खताळ, गजानन गरिबे, जयवंत खंडवी यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.