वसई/विरार/नालासोपारा : वसई तालूक्यातील पाच दिवसांच्या गणेशमूर्तीचे सोमवारी वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. पाच दिवसांनी विसर्जन होणाऱ्या गणेशमूर्तीची संख्या मोठी असल्याने जिल्ह्यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. वसई-विरार अग्निशमन दल, आपत्कालीन पथक व महापालिकेनेही गणेश विर्सजनासाठी चोख तयारी केलीली दिसून येत होती. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवलेला होता.अर्नाळा समुद्रकिनारीही घरगुती व सार्वजनिक मंडळांचे गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. वसईत अनेक ठिकाणी श्रीगणेशासोबत गौराईलाही निरोप देण्यात आला. सहा दिवस अभ्यंग, पंचामृत, धूप, दीप, मोदकांचा नैवद्य असा भक्तांचा पाहुणचार घेऊन श्रीगणेशाने सोमवारी निरोप घेतला. दुपारनंतर वसई तालूक्यातील अनेक तलावांवर, तालुक्यातील खाडीकिनारी व विसर्जनस्थळी गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या..! जयघोषात गौरी -गणपतींच्या मिरवणुका दाखल होणे सुरू झाले होते. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी वसईत विसर्जनस्थळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विसर्जनस्थळी होणाºया सामूहिक आरत्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. बाप्पाला निरोप देताना वातावरण भारावून गेले होते.ग्रामीण भागात समुद्रकिनारी, तलाव, बावखल तर शहरी भागात मोठ्या तलावांमध्ये सार्वजनीक गणेशमुर्तींसहित घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत विसर्जनासाठी लोकांची गर्दी ओसंडून वाहत होती. विरारमधील बोळींज, आगाशी, डोंगरपाडा, मनवेलपाडा तर नालासोपारा येथील आचोळे, सोपारा चक्रेश्वर तलाव व नाळा गावातील तलावांवर मोठी गर्दी होती. वसईतील गोखीवरे, दिवाणमान, निर्मळ आदी ठिकाणी विसर्जन शांततेत पार पडले.पाच दिवसांनी बाप्पांला निरोप देताना भक्तांना गहीवरून आले होते. अखेर शेवटची मंगल आरती आटोपून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असे आग्रहाचे निमंत्रण देऊन साश्रुनयनानी बाप्पांना निरोप देण्यात आला.माहेरवाशिणीला निरोपवसईतील पश्चिम ग्रामीण भागात घरोघरी मोठ्या भिक्तभावाने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या गणराय आण िगौराईचा विसर्जन सोहळा सोमवारी झाला.गेले दोन दिवस माहेरवासीण म्हणून आलेल्या गौराईला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पानंतर माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईचे थाटामाटात स्वागत करण्यात आले होते. गौरीला नैवेद्य दाखिवण्यात आला. नाळे गावातील लाखोडी, देवीची वाडी, भंडारआळी, मांगेलआळी आदी ठिकाणी ५ दिवसांच्या चैतन्याची लाट घेऊन आलेल्या बाप्पांना सोमवारी नाळे तलावात विसर्जित करण्यात आले.५६ पदार्थांचे नैवेद्य देऊन गौरीला निरोपपारोळ : माहेरवाशीण गौरींना प्रसन्न करण्यासाठी ५६ पदार्थांचा नैवेध्य दाखविण्याची वसई भागात परंपरा असून गणरायासाठी जागरण व नाच गाणे यामुळे गत पाच दिवस उत्स्हाचे ठरले. मात्र, सोमवारी ज्येष्ठ गौरी-गणपतींना निरोप देताना भक्तांचे मन भरुन आले होते. पुरण पोळी, रव्याचे लाडू, बेसणाचे लाडू, साटोरी, अनारसे, तांदळाची खीर, गव्हाची खीर, घावणे, पुरी भाजी, सानका, देठांची भाजी , शेतात आताच तयार झालेल्या वाल पापडीची भाजी व उकडीचे मोदक यांची घरोघरी रेलचेल होती. फुगड्या, बस फुगडी, झिम्मा खेळण्यासाठी माहेरवाशीणी घरी आल्या होत्या. या द्वारे माहेरवाशिणीला खुश करण्यासाठी व त्या रुपाने लक्ष्मी-सरस्वतीच्या रूपाने देवीचे घरावर वरदहस्त राहण्यासाठी पूजन करण्यात आले.रात्रभर जागर करताना पारंपारिक गीते फुगड्या, फेर धरून नाच केला गेला. वसईतील घरा घरात पान फुलांची, तेरड्याची,खड्याची , मुखवट्याची, उभी, बसलेली, चित्राची असे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील गौरींचे पूजा प्रकार पहावयास मिळाले. गणपतीची आई, लक्ष्मी अशा अनेक रूपाने पूजा केल्यानंतर सोमवारी गौरींचे विसर्जन मोठ्या भक्ती भावाने पाच दिवसांच्या बाप्पांसह करण्यात आले. यावेळी गौरी मातेची मूर्ती डोक्यावर घेऊन मैल दोन मैल लांब अनवाणी पावलांनी विसर्जन ठिकाणी जात असताना दिसत होत्या. गौराईला महिलांनीच विसर्जनाला घेऊन जाण्याची पद्धत येथे आहे. तर काही ठिकाणी गौरी व गणपती यांची एकत्रित मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले .वसई-विरार महापालिका क्षेत्रात पाच दिवसांच्यां ११ हजार ६७३ गणपती बाप्पांना भाविकांनी निरोप देण्यात आला. त्यात प्रभाग समिती ‘ए’ १७६४, ‘बी’ हद्दीत १४९२, ‘सी’ हद्दीत १४९७, ‘डी’ हद्दीत १६९९, ‘ई’ हद्दीत १३९० , ‘एफ’ हद्दीत ४७५ , ‘जी’ हद्दीत १३१४ ,‘एच’ १२८६, ‘आय’ हद्दीत ७५६ अशी गणपतींच्या मूर्तींची संख्या होती. आज होणाया पाच दिवसांच्या गणपतींचे व गौरीचे विसर्जन निर्वीघ्नपणे पार पाडावे यासाठी चोख बंदोबस्त ठेवला असून प्रशासनाला सुचना देण्यात आल्या असल्याची माहिती महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती सुदेश चौधरी यांनी दिली.
पाच दिवसांच्या बाप्पा, गौराईला निरोप...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 3:21 AM