डहाणू/कासा : गडचिंचले हत्याकांड प्रकरणी सीआयडीने आणखी पाच जणांना अटक केली आहे. या आरोपींना शुक्रवारी डहाणू न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना १३ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पाचही आरोपी हे गडचिंचले येथे राहणारे असून त्यामध्ये दोन आरोपी ६० वर्षाचे आहेत.सीआयडीचे उपअधीक्षक इरफान पठाण यांनी शुक्रवारी पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. सहाय्यक अभियोक्ता अॅड आर. बी. वळवी यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने मागणी मंजूर केली असून सर्व पाचही आरोपींना १३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींतर्फे अॅड. जावेद मुन्शी यांनी बाजू मांडली.१६ एप्रिल रोजी गडचिंचले येथे जमावाने दोन साधू आणि त्यांचा चालक यांची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी आधीच ११० जणांना अटक झाली होती. गुन्ह्यात सहभागी असलेल्या ९ अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे. या प्रकरणात १०१ आरोपींना आणखी १४ दिवसांची पोलीस कोठडी गुरुवारीच वाढवून देण्यात आलेली आहे. आता आणखी पाच आरोपींना गुरुवारी अटक केली असून शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर सादर करण्यात आले.
साधूंच्या हत्येप्रकरणी आणखी पाच आरोपींना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 5:43 AM