मुंबई - भाईंदर येथील गोल्डननेस्ट परिसरात नवघर पोलिसांनी सापळा रचून नव्या भारतीय चलनातील बनावट नोटांसह पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हि कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना मिळलेल्या गुप्त माहितीनुसार नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी भाईंदर येथील गोल्डननेस्ट परिसरात २५ जून रोजी दुपारी ३.२० वाजता सापळा रचला. या ठिकाणी मारुती एर्टिगा (एमएच०२, सीपी १२२७) या खाजगी वाहनातून ४ जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार फैजल हिदरीस शेख, इम्रान अस्लम चारोली, सैय्यदरिझवान अजान सैय्यद, सौऊद सैय्यद सलीम आणि मनीष मेखिया या पाच जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मनीष हा अंधेरीतील गुंदवली भागात राहणार असून इतर आरोपी हे मीरा रोडच्या नया नगर परिसरात राहणारे आहेत. या पाच आरोपींकडून पोलिसांना नव्या भारतीय चलनातील २ हजार रुपयांच्या ५० बनावट नोटा, दोनशे रुपयांच्या १०३ बनावट नोटा अशा एकूण १ लाख २० हजार सहाशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तसेच घरझडतीत ४ धारदार तलवारी, १ कुपरी, १ एअर पिस्तूल आणि १ बेस बॉल स्टिक अशी हत्यारे या आरोपींकडे सापडली. हि टोळी गोवा, महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी बनावट नोटा घेऊन निघाली असल्याची माहिती डॉ. महेश पाटील यांनी दिली. त्याचप्रमाणे फैजल या आरोपीच्या वडिलांविरोधात देखील बनावट नोटा सापडल्याने मुंबईत गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असल्याचे पुढे पाटील यांनी सांगितले.