बोईसर : तारापूर एमआयडीसीतील एम-२ या प्लॉटमधील तारा नायट्रेट या रासायनिक कारखान्यात शनिवारी संध्याकाळी भट्टीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात सुरक्षारक्षक अन्सारी इलियास (४०), राजमतीदेवी सुरेंदर यादव (४०), निशू राहुल सिंग (२६), माधुरी वशिष्ठ सिंग (४६), गोलू सुरेंदर यादव (१९), मोहन (४५) हे सहा जण ठार झाले आहेत. तर २ लहान मुलींसह ७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये कारखान्याचे मालक नटूभाई पटेल यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले. स्फोटाने कोसळलेल्या कारखान्याच्या ढिगाºयाखाली काही जण अडकल्याची शक्यता आहे. स्फोटाचा हादरा सुमारे ३० किलोमीटरच्या परिसरात जाणवला.
तारापूरमधील तारा नायट्रेट या कारखान्यात संध्याकाळी सातच्या सुमारास भीषण स्फोट झाला. नंतर झालेल्या भीषण स्फोटात कारखान्याच्या इमारतीचा काही भाग कोसळला. ढिगाºयाखाली अडकलेल्यांचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत.
बचावकार्यासाठी एनडीआरएफलाही पाचारण करण्यात आले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी त्या भागातील रस्ते बंद केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या कारखान्याच्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने तिथे बांधकाम मजूरही होते.
या मजुरांच्या कुटुंबातील दोन लहान मुलीही स्फोटात गंभीर जखमी झाल्या आहेत. स्फोटानंतर या कंपनीतील काही अवशेष उडाल्याने बाजूच्या कारखान्यांचेही नुकसान झाल्याचे समजते. या कंपनीमध्ये नव्या उत्पादनाची ट्रायल घेण्यात येत होती. स्फोटानंतर पालघर भागातील अनेक गावांना भूकंप झाल्याचा भास झाला, मात्र काही वेळाने परिसरात स्फोट झाल्याचे समजले.मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदततारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना सर्व वैद्यकीय साहाय्य पुरविण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्यमंत्री स्वत: बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. बचावकार्यासाठी एनडीआरएफची मदत घेण्यात आली आहे.