वाडा : रविवारी आलेल्या महापुराचा फटका तालुक्यातील ६० गावांना बसला असून पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तर काही जणांची घरे पुराच्या पाण्यात जमीनदोस्त झाली आहेत. भातशेतीचेही मोठे नुकसान झाले. रविवारच्या पुराने वाड्याला अक्षरश: धुतले आहे.रविवारच्या महापुराचा सर्वाधिक फटका बोरांडा गावाला बसला असून या गावातील अनेक घरात पुराचे पाणी घुसल्याने येथील नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील अन्नधान्य, कपडलत्ते अशा महत्त्वाच्या वस्तू पावसाच्या पाण्यात भिजून खराब झाल्या आहेत. या गावातील रवी राजकवर, दत्तू पवार, भरत राजकवर या तीन आदिवासी बांधवांची घरे पडली असून त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गावातील तरुण शेतकरी प्रतीक पाटील, सचिन पाटील, विवेक कवळे यांच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये पुराचे पाणी घुसल्याने सर्वच कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. यात त्यांचे प्रत्येकी सहा लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे प्रतीक पाटील यांनी सांगितले.पुराचा तडाखा शेतीलाही बसला असून सुमारे १२५ ते १५० एकर भात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पॉवर टिलर, ट्रॅक्टर ही यांत्रिक अवजारे शेतावर असल्याने ती पुराच्या पाण्यात बुडून त्याचेही नुकसान झाले आहे. यातील रत्नाकर टबेले यांच्या ८ बकºया आणि ४ वासरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. या गावातील एकमेव विहिरही पाण्याखाली गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुराचा सर्वाधिक फटका या गावाला बसला आहे. त्यामुळे, नागरिकांच्या घरात सर्वत्र चिखल दिसतो आहे.खुटल बागपाडा येथील २३ घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने नासाडी झाली आहे. सापने खुर्द डोलीपाडा येथील विठ्ठल डोली, सुरेश पातळकर, बाबल्या डोली, महादू गुरूडा, किशोर डोली, सुभाष डोली, जयराम डोली या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने वस्तूंची नासाडी झाली आहे. घरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तसेच खरीवली, नाणे, करंजपाडा, हमरापूर पिंपळास, पिंगेमान, केळठण, निंबवली, डाकिवली या गावातही मोठे नुकसान झाले आहे. मलवाडा येथील पुलाजवळील रस्ता वाहून गेल्याने वाडा - जव्हार मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मलवाडा परिसरातील विद्यार्थी वाडा येथे शिक्षणासाठी येत असतात. मात्र, आता त्यांना मोठा फेरा देऊन यावे लागणार आहे.गांध्रे येथील शेखर भोईर, प्रभाकर भोईर यांच्या तबेल्यात पुराचे पाणी घुसल्याने २८ म्हशी, २५ पारडे, ३ जर्सी गाई, ११ बक-या, ५० कोंबड्या व एक शेड पुराच्या पाण्यात वाहून गेले असून त्यांचे एक कोटीहून अधिक नुकसान झाले आहे.दरम्यान, पुराच्या पाण्यात बाधित झालेल्या नागरिकांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुरेश पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे. तर पुराच्या पाण्यात भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी कुणबी सेनेचे वाडा तालुका अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.वसई तालुक्यात पुरामुळे मोठे नुकसानपारोळ : वसई तालुक्यातील तानसा नदीला आलेल्या पूरामुळे मोठे नुकसान झाल्याच्या खुणा पूर ओसरल्यावर दिसत असून पूरामुळे उसगाव - भाताणे मार्ग वाहून गेला आहे. तसेच या भागातील शेकडो हेक्टर भात पीक पुराच्या पाण्यात बुडून राहिल्याने खराब झाले असून अनेक गावांमध्ये पाणी घुसले आहे. शेतात लावणी केलेले भातही चार दिवसांपासून पाण्याखाली राहिल्याने ते कुजून खराब झाले आहे. पुरामुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करण्याची मागणी या येथील नागरिक करत आहेत. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे उसगाव - भाताणे मार्ग वाहून गेल्याने अनिश्चित काळासाठी १० गावांचा संपर्क तुटला असून १ कि.मी. अंतरावरील उसगाव येथे येण्यासाठी आता भाताणे, नवसई, आडणे, थल्याचापाडा, हत्तीपाडा, येथील नागरिकांना २० कि.मी.चा प्रवास करावा लागेल.या भागात आदिवासी बांधव रहात असल्याने हा मार्ग लवकर दुरूस्त न केल्यास या भागातील मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तानसा नदीला आलेल्या पुरामुळे कोपर, खानिवडे, उसगाव, चांदीप, पारोळ, शिरवली, नवसई, भाताणे इ. गावांमध्ये पुराचे पाणी आले होते. येथील अनेक घरे पाण्याखाली गेल्याने खावटीसाठी साठा करून ठेवलेले धान्य भिजून नुकसान झाले. तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्यही खराब झाले. जागोजागी साठलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही उभा राहिला आहे. पूरग्रस्त गावातील पाणी ओसरताच गावातील, नुकसानीचे पंचनामे करून ज्याचे नुकसान झाले आहे त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात येईल, असे तहसिलदार किरण सुरवसे यांनी सांगितले.मनोरमध्ये घरात, दुकानात पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसानमनोर : मनोर गाव आणि परिसरातील गावांना पुराचा तडाखा बसला असून घरातील तसेच दुकानातील सामान भिजून खराब झाले. काही वस्तू वाहून गेल्या आहेत. पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सोमवारी सकाळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ेदेखील या भागाचा दौरा केला.मनोर ग्रामपंचायत हद्दीतील रुफी कॉलनी येथे घराच्या छतापर्यंत पाणी भरल्याने जवळजवळ वीस ते पंचवीस घरांचे प्रचंड नुकसान झाले.तसेच सनसिटी कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या माळ्यावर पाणी भरल्याने किराणा माल आणि दुकानातील इतर सामान भिजून जवळजवळ २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले. करळगाव, दुर्वेस काटेल पाडा, नांदगाव, हलोली, खम्बलोली, बहडोली, टाकव्हल, मस्तान नाका अशा नदीकाठी असलेल्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले. अद्याप शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत पोहोचलेली नसून तलाठी आणि मंडळ अधिकाºयांकडून पंचनामे सुरू आहेत.
वाड्यातील ६० गावांना पुराचा तडाखा; पूल गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:29 PM