जव्हार : जव्हारहून सात कि.मी. अंतरावर केळीचापाडा (काळशेती) येथील धबधब्यावर पोहायला गेलेल्या जव्हारमधील अंबिका चौक येथील काही तरुणांपैकी पाच तरुण बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
जव्हारमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे बाजारपेठ बंद आहे. लोकांचीही रस्त्यांवर रहदारी कमी आहे. याच वेळी अंबिका चौक येथील १३ तरुण काळमांडवी धबधब्यावर पोहण्यासाठी गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास गेले होते. हा धबधबा खूप मोठा व खोल दरीत आहे. येथे पावसाळ्यात खाली उतरायला तारेवरची कसरत करावी लागते. यात तीन मोठे पाण्याचे डोह आहेत, मात्र काही तरुणांना खोलीचा अंदाज न आल्यामुळे एकाच वेळी पाच तरुण बुडाले.निमेश पटेल, बाळा फलटणकर, दादू वाघ, प्रथमेश चव्हाण, रिंकू भोईर अशी बुडालेल्या पाच तरुणांची नावे असून हे पाचही जण १८ ते २२ वयोगटातील आहेत. या तरुणांचे मृतदेह सापडले असून ते शवविच्छेदनासाठी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जव्हार पोलीस तपास करीत आहेत.