लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी २५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जिल्हा महसूल विभागामार्फत शासनाकडे मागणी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यातील १८ कोटी ०४ लाख ०९ हजर रुपये शेतकऱ्यांना तहसीलदारांमार्फत या आठवड्यात वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील जून ते ऑक्टोबर-दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे ६२ हजार ७९८ शेतकऱ्यांचे २५ हजार ५८०.६६ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले होते. या आपद्ग्रस्तांना शासनाच्या शेतपिकासाठी जिरायत आश्वासित सिंचनाखालील पिके याअंतर्गत यापूर्वी शासनामार्फत ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर इतकी तरतूद होती. त्यामध्ये ९ नोव्हेंबर २०२० रोजी शासन निर्णयान्वये ३ हजार २०० रुपये प्रति हेक्टर वाढ होऊन एकूण १० हजार रुपये प्रति हेक्टर करण्यात आली आहे. बहुवर्षीय पिकासाठी यापूर्वी १८ हजार प्रति हेक्टरी इतकी तरतूद होती. त्यामध्ये ९ नोव्हेंबर २०२० रोजी ७ हजार रुपये प्रति हेक्टरी वाढ करून एकूण २५ हजार प्रति हेक्टर शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करण्याबाबत आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.
अनुदान वाटप करण्याचे तहसीलदारांना आदेशn जिल्ह्यासाठी एकूण २५ कोटी ५८ लाख ५२ हजार रुपये अनुदानाची गरज होती. त्यापैकी ९ नोव्हेंबर रोजी ७ कोटी ५४ लाख ४३ हजार अनुदान महसूल व वन विभाग मदत व पुनर्वसन अंतर्गत यांच्याकडून प्राप्त झाले होते. त्याचे वाटप संबंधित तहसीलदारामार्फत बाधित शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. n शासनाकडून ७ जानेवारी २०२१ रोजीच्या आदेशान्वये उर्वरित संपूर्ण रक्कम १८ कोटी ०४ लाख ०९ हजार अनुदान महसूल व वन विभागाच्या मदत व पुनर्वसन अंतर्गत प्राप्त झाली आहे. हे अनुदान तहसीलदारांना वाटप करण्यात आले आहे.