पारोळ : वसईतील फुल शेतीचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले असून झाडावरील फुले भिजल्याने ती खराब झाली. त्यामुळे फुल शेतीला या पावसाने मोठा फटका दिला आहे. यामुळे तालुक्यातील फुल शेती कोमेजली आहे. अती पावसामुळे झाडे उभी आहेत पण फुले येत नसल्याचे चित्र या परिसरात फिरताना दिसते आहे. तर भातशेती प्रमाणे या फुलशेतीची नोंद सातबाऱ्यावर नसल्याने नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांपुढे अडचण उभी राहणार आहे. भातपीक तसेच भाजीपाला या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना शासनाची मदत मिळत असते, पण सातबाºयामुळे हे फुल शेतकरी नेहमी शासकीय मदतीपासून वंचित राहतात. आता या पावसाने केलेल्या फुलशेतीचे पंचनामे करून आम्हाला प्रशासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
वसई फुलशेतीसाठी प्रसिद्ध असून या फुलांना मुंबईच्या बाजारात मोठी मागणी आहे. सोनचाफा, मोगरा, कागडा, नेवाली, तुळस, लिली, गुलाब, जास्वंदी, केवडा, आदी फुलांची शेती येथे केली जाते. शेतकरी या फुलांची विक्री मुंबई बाजारात करतात. सकाळी पहिल्या लोकलला शेतकरी ही फुले विक्रीसाठी नेतात. इतर ठिकाणाहून येणाºया फुलांपेक्षा वसई मुंबईजवळ असल्याने ही फुले ताजी असतात. तर रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केल्याने ती सुगंधी तसेच टिकाऊ असतात. यामुळे वसईतील सोनचाफ्याला मोठी मागणी आहे. या फुलशेतीवर वसईकरांचे आर्थिक गणित अवलंबून असून या फुलशेतीची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. पण यंदा पावसाने फुलशेतीचे मोठे नुकसान केले असून हजारो शेतकरी बाधित झाले आहेत. झाडांना अति पाणी झाल्याने फुले खराब होत फुलझाडालाही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ती जगवण्यासाठी औषधे वापरावी लागणार असल्याने त्यासाठी शेतकºयांना मोठा खर्च करावा लागणार आहे. ऐन दिवाळीच्या हंगामात पीक वाया गेल्याने पुढील खर्च कसा उभा करायचा हा प्रश्न या शेतकºयांपुढे आहे.वसईतील पावसामुळे झालेल्या फुल शेतीच्या नुकसानीची चे पंचनामे करून त्या शेतात कोणते पीक आहे.यांची नोंद करून नुकसान भरपाई साठी प्रशासनाकडे पाठवली जाईल-किरण सुरवसे, तहसीलदार वसइमहाराष्ट्रात प्रशासन फक्त भात, ऊस कापूस, सोयाबीन या पिकांच्या नुकसानीचीचे पंचनामे केले जात असून फुल शेती चा कोणीही बोलत नसल्याने आम्हा फुल शेतकºयांना सापत्न वागणूक दिली जात आहे.-सुभाष भट्टे, फुल शेतकरी वसई