डहाणू : डहाणू उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी कोरोना आजारासाठी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली. शहरातील गर्दीची ठिकाणे असलेल्या पारनाका, मसोलीनाका, तारपा चौक नाका, स्टेशन चौक येथे रात्री कारवाई केली.
बाजारपेठेतील दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट येथे कोविड १९ अंतर्गत करावयाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आल्याने, तसेच कोरोनाचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने स्थानिक पोलीस आणि नगर परिषद प्रशासन यांच्यासोबत संयुक्त कारवाई केली. विनामास्क दुकानदार, पादचारी, वाहचालक यांच्याकडून प्रतिव्यक्ती २०० रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. तसेच, मास्क वापरण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली. यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्याचे व तोंडाला मास्क लावून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मित्तल यांनी केले.
मित्तल यांनी परिपत्रक जारी करून डहाणूत कोरोनाबाबत महत्त्वाचे पाच आदेश दिले आहेत. त्यानुसार जलतरण तलाव बंद करणे, दुकानदाराने मास्क घालणे व एका वेळी पाचपेक्षा अधिक लोकांना दुकानात न घेणे, बँकेमध्ये सामाजिक अंतराचे व कोरोना नियमांचे पालन करणे, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे तसेच रेस्टॉरंटमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास दाेन हजारांचा दंड करण्याची कारवाई, लग्न समारंभासाठी शासकीय कार्यालयाची परवानगी घेणे हे आदेश मित्तल यांनी दिले आहेत.
विक्रमगड शहरात दर बुधवारी आठवडा बाजार भरत असून नालासोपारा, वसई, पालघर, विरार या भागातील अनेक व्यापारी मोठ्या संख्येने येत असतात. यामुळे या बाजारात ग्राहक व व्यापाऱ्यांची मोठी गर्दी होत असते. सध्या विक्रमगड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नसला तरी प्राथमिक सुरक्षा म्हणून बुधवारी विक्रमगड येथील तहसीलदार तथा मुख्याधिकारी श्रीधर गालिपेली यांच्या पथकाने धडक कारवाई केली.