लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : घर विकत देतो, असे सांगून पैसे घेऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पकडतील आणि फसवणूक केलेले मारतील, या भीतीने दोन वर्षांपासून तो घरातून बाहेर पडला नव्हता, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली.
खोरपीपाडा परिसरातील आरोपी वैकुंठ मिश्रा याने ४ लाखांत ३०० स्केअर फूटची रूम देतो असा व्यवहार ठरवून फिर्यादीकडून चेकद्वारे एकूण अडीच लाख रुपये घेतले. फिर्यादीला रूम आणि पैसेही परत न करता आर्थिक फसवणूक केली.
अनेकांची फसवणूकवालीव पोलिसांनी आरोपी वैकुंठ ब्रिजराज मिश्रा याला विरार येथून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने अनेकांना फसवले आहे. पोलिस अटक करण्याच्या भीतीने व फसवणूक झालेले मारहाण करतील, या भीतीने घरातून बाहेर पडलो नाही, अशी कबुली त्याने दिली. या आरोपीने वालीव व नायगाव पोलिस ठाण्यातही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तीन गुन्ह्यांची उकलआरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहायक पोलिस आयुक्त विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे, जिलानी सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप, मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळू कुटे, विनायक राऊत, अभिजित गढरी यांनी पार पाडली आहे.
गुन्हा घडल्यापासून आरोपी भूमिगत झाला होता. आरोपीने त्याचे सर्व भ्रमणध्वनी क्रमांक बंद केले होते. तांत्रिक विश्लेषण, मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास केला.