सुरेश काटेलोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : आदिवासी समाजाने शिकले पाहिजे, शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे, यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही आदिवासी गावपाड्यात ना चांगले रस्ते ना शाळा, ना नदीवर पूल अशी तलासरी तालुक्यात स्थिती आहे. आदिवासी समाजाच्या मुलांना कच्चा रस्ता आणि नदीच्या पाण्यातून शिक्षणासाठी जावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र तलासरीतील सूत्रकार काटीलपाडा, वेडगपाडा येथील विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडताना दिसून येत आहे. या पाड्यातील मुलांना शाळेत येण्यासाठी गावातून वाहत जाणारी काळू नदी जीव मुठीत घेऊन पार करावी लागते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास शाळेला दांडी मारावी लागते अन्यथा चार किमीचा फेरा मारावा लागतो.
आदिवासी भागासाठी रस्ते, पूल यासाठीही मोठा निधी खर्च होतो, पण आदिवासी समाजासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्याच्या राजकारण्यांच्या वल्गना त्यांच्या फायद्यासाठी आहेत का? हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. तलासरीतील सूत्रकार काटीलपाडा, वेडगपाडा येथील शेकडो मुले शिक्षणासाठी सूत्रकार शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा तसेच सुरतीपाडा येथील खासगी शाळेत येतात. सूत्रकार पुरातन शंकर मंदिर येथे नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे, पण बंधाऱ्यावरून जाताना बंधारा निसरडा असल्याने पाय घसरून पाण्यात पडण्याची भीती आहे. यामुळे शालेय मुले, गावातील शेतकरी पाण्याचा उतार कमी असलेल्या ठिकाणावरून नदी ओलांडतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. नदीला अचानक पूरही येतो. अशा वेळी मुले नदी ओलांडत असताना नदीला पूर आल्याने वाहून जाण्याची भीती आहे.
काळू नदीवर पूल बांधावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दहा वर्षांपूर्वी नदीवर पूल मंजूर झाला होता. निधी न मिळाल्याने पुलाचे काम रखडले पूल व रस्ता बांधण्यास एक कोटी निधीची गरज आहे. तलासरी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या ठिकाणी पुलाचा प्रस्ताव नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे. पण त्यास अजून मंजुरी न मिळाल्याने मुलांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास नदीपात्रातून सुरू आहे.
काळू नदीवर शंकर मंदिराजवळ पुलाचा प्रस्ताव नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे - सार्वजनिक बांधकाम खाते, तलासरीपूल नसल्याने विद्यार्थी, गावकऱ्यांनाही नदी पात्रातून ये-जा करावी लागते. दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.- रत्ना शिडवा रयात, पालक
नदीवर पूल मंजूर होता, पण तो बनविण्यात आलेला नाही. पूल नसल्याने विद्यार्थ्यांना चार किमीचा प्रवास करावा लागतो. - माधुरी धर्मा गोवारी, सरपंच, सूत्रकार