- मंगेश कराळेनालासोपारा - जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक करण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून सात गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी गुरुवारी दिली आहे.
विरारच्या विवा तारांगणमधील उत्तरा सोसायटीत राहणाऱ्या विद्या मुकुंद गुरव (५५) या ६ ऑगस्टला संध्याकाळी सातच्या सुमारास टोटाळे तलावाजवळील पालिकेच्या वाचनालया समोरील रस्त्यावरून घरी जात असताना शंकर हाल्या दिवा या आरोपींनी त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. विरार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाची माहिती पोलीस ठाण्यात प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी धाव घेवुन माहितीच्या आधारे शोध आरोपीचा शोध घेऊन शंकर हाल्या दिवा (२६) याला ताब्यात घेवुन तपास केला. त्याने सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले तसेच त्याने विरार पालिस ठाणे अभिलेखावरील ५ गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे.
सदर आरोपीकडे अधिक तपास केल्यावर इतर आरोपी जॅक ऊर्फ कुंदन सुरेंद्र नाक (२३) आणि गोविंदा अनिलकुमार गौंड (२१) यांनी चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याचे माहीती मिळाली. या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवुन तपास केल्यावर त्यांनी विरार व गणेशपुरी येथील अभिलेखावरील २ गुन्हे उघड झाले आहे. अटक आरोपीकडून घरफोडीचे ७ गुन्हे उघड करून २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देखमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, विशाल लोहार, योगेश नागरे, मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव व प्रफुल सोनार यांनी केलेली आहे.