वसंत भोईर
वाडा : तालुक्याला २४ हजार हेक्टर क्षेत्र असलेले जंगल लाभलेले आहे. या जंगलाची राखण होण्यासाठी वाडा तालुक्यात वाडा पूर्व, वाडा पश्चिम व कंचाड असे तीन स्वतंत्र विभाग केलेले आहेत, तसेच वनविकास महामंडळ, वन्यजीव, अभयारण्य या विभागासाठी वर्ग-२च्या पाच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून शंभरहून अधिक कर्मचारीवर्ग नेमण्यात आलेला आहे, तसेच रोजंदारीवर काम करणारे शेकडो मजूर या कर्मचाऱ्यांच्या दिमतीला आहेत. तरीही दरवर्षी पौष महिना संपला की, माघ महिन्यात येथील जंगलांना आगी लागण्याचे प्रकार सुरू होतात. या आगी लागत नाहीत, तर लावल्या जातात, असा आरोप केला जात आहे.
जंगलांना लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण जंगल होरपळून नव्याने लागवड केलेली वनसंपदा जळून खाक होते. येथील जंगलांना लागल्या जाणाऱ्या आगी या मानवनिर्मित असतानाही आजपर्यंत याबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. वाडा तालुक्याला लाभलेल्या वनसंपदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलखुणा दर्शविणारा ऐतिहासिक कोहोज किल्ल्याचा समावेश आहे. २०० हेक्टरहून अधिक क्षेत्र असलेल्या या कोहोज किल्ला परिसरात लाखोंच्या संख्येने विविध प्रजातींमधील वनसंपत्ती आहे. मोठ्या प्रमाणावर वन औषधी झाडेही आहेत. मात्र, दरवर्षी येथील जंगलाला आग लागते व या आगीत हजारो नव्याने लागवड केलेली, तसेच वन औषधी वनसंपदा जळून खाक होते.येथील जंगलाची राखण करण्यासाठी वनविभागाने महाराष्ट्र वनविकास महामंडळ यांच्यावर जबाबदारी दिली आहे.वनविकास महामंडळाच्या वन अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली असता, आग लागलेले क्षेत्र आमच्या अखत्यारित येत नाही, असे बोलून जबाबदारी टाळत असतात. दरम्यान, या आगी आटोक्यात आणण्यापूर्वीच या जंगलातील निम्म्याहून अधिक वनसंपदा होरपळून गेलेली असते. आग विझविण्यासाठी वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे या आगी आटोक्यात येत नाहीत. आजवर आगी लावणाऱ्यांविरोधात वनविभागाने कारवाई केलेली दिसून येत नाही.