आशिष राणे
वसईतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व तथा ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक प्रदीप लक्ष्मण राणे (वय 65) यांचे बुधवार दि.12 मे रोजी सकाळी 10 वाजता अल्पशा आजाराने वसईतील खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडली असता तात्काळ त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात रात्रभर उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी सकाळी त्यांची झुंज अपयशी ठरली.
शांत, सुस्वभावी, मनमिळाऊ सर्वांच्या मदतीला धावून जाणारे प्रदीप राणे हे उच्चशिक्षित व वसईतील प्रतिष्ठित घराण्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वानाच सुपरिचित होते. बँकिंग क्षेत्रात व आपल्या स्वतंत्र व्यवसायात ही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उच्चशिक्षण घेतानाच सहकारातील अग्रगण्य अशा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत लिपिक पदापासून ते सरव्यवस्थापक पदापर्यंत 22 वर्षे अशी उत्तम सेवा बजावली होती. मात्र मधुमेहामुळे त्यांनी अवघ्या 47 व्या वर्षी सन 2003 ला आपल्या पदाचा राजीनामा देत स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
बँकिंग सेवेत त्यांनी ठाणे, वसई,मुरबाड, वाडा ,जव्हार, डहाणू ,पालघर बोईसर आणि सफाळे आदी बँकांच्या शाखेत सेवा बजावत एक मोठा जनसंपर्क निर्माण करून खातेदार,ग्राहक व बँक यांचे नाते घट्ट करीत बँकेला प्रगतीपथावर नेलं होत.त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती नंतर देखील त्यांच्या याच स्वभावाने ते आजही टीडीसीसी बँकेत व मुंबई ते डहाणू अशा संबंध अष्ठाघरात ओळखले जात होते. प्रदीप राणे यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीतील व सहकार क्षेत्र यांच्यासह बँकिंग मधील त्यांचा मित्र परिवार शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व सून नातवंडे असा परिवार आहे.