मंगेश कराळे
नालासोपारा (मंगेश कराळे) : अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पोलिसांनी नायगाव शहरातून करोडो रुपयांच्या चरस या अंमली पदार्थांसह चार आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मिळाल्याने वसईत खळबळ माजली आहे.
नायगांवच्या जूचंद्र येथील सोमेश्वर नगर येथील द मॉर्डन इंग्लिश हायस्कूल आणि कॉलेजच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पोलिसांनी सापळा रचून चार तरुणांना ताब्यात घेतले. आरोपी अमित सिंग (३१) याच्या कब्जातून ९४ लाख ८० हजारांचे २ किलो ३७ ग्रॅम चरस, आशिष भारद्वाज (२८) याच्या कब्जातून २० लाख १२ हजारांचा ५०३ ग्रॅम चरस, अभिषेक सिंग (२६) याच्या कब्जातून ४० लाख १६ हजारांचे १ किलो ४ ग्रॅम चरस आणि सतेंद्र पाल उर्फ सोनू (३१) याच्या कब्जातून ६० लाख ५२ हजारांचा १ किलो ५१३ ग्रॅम चरस असे चारही आरोपींच्या ताब्यातून २ करोड १५ लाख ६० हजारांचा ५ किलो ४२६ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ व्यवसायिक प्रमाणात बाळगलेला मिळून आला आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस हवालदार प्रदीप टक्के यांनी रविवारी नायगांव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन एनडीपीएस ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.