विरार : दोन वर्षांपूर्वी येथील एका घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या एका दरोडेखोराच्या टोळीतील चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर टोळीच्या म्होरक्याचा माग पोलीस काढीत आहेत.विरार पश्चिमेकडे राहणाऱ्या निशा लोणकर या घरी एकट्या असतांना २३ जानेवारी २०१५ रोजी दुपारी पाच दरोडेखोरांनी त्यांच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरु केला होता. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव वेदपाठक यांना बातमीदारांने दिलेल्या माहितीवरून शाखेच्या पथकाने फरहान अन्सारी (२८, रा. कांदीवली), इम्तियाज चौधरी (३०, रा. कांदीवली), सतेश गाजुलकर (४५, रा. कांदीवली), सर्फराज खान (२५, रा. कांदीवली) यांना कांदीवली येथील वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचा म्होरक्या अयुब असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त केलेली आहे. पुढील तपास सुरु आहे. (वार्ताहर)
विरार दरोड्यातील चार आरोपी २ वर्षांनी अटकेत
By admin | Published: February 21, 2017 5:17 AM