लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- जबरी चोरी, घरफोडी व रिक्षा चोरी करणाऱ्या चौकडीला नायगांवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी अटक केले आहे. चारही आरोपीकडून पोलिसांनी नायगाव पोलीस ठाण्यातील ८ गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ नोव्हेंबरला पहाटे साडे पाचच्या दरम्यान नायगांव रेल्वे स्थानकाजवळ आरोपीने एका प्रवाशाला धक्का मारून त्याच्या हातातून जबरीने मोबाईल खेचून आरोपी पळून गेले. तसेच ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री महामार्गावरील महालक्ष्मी स्वीट मार्ट समोरील मोकळ्या जागेत लावलेली ४० हजार रुपये किंमतीची रिक्षा चोरट्याने चोरून नेली होती. या दोन्ही घटनेप्रकरणी नायगाव पोलिसांनी जबरी व वाहन चोरीचे गुन्हे दाखल केले होते.
दोन्ही गुन्ह्याच्या तपासात नायगांवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी घटना स्थळावरील सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी आकाश बन्सी जैस्वाल (२३), रहीम सलीम खान (२०), अंकुश रंगनाथ सजने (२५) आणि अनंत रंगनाथ सजने (२३) या चारही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी करून पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांपैकी आठ गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून चोरी केलेले रिक्षा, मोबाईल, रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा एकूण २ लाख ४६ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर तसेच गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, गणेश केकान, पोलीस हवालदार देविदास पाटील, सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, अमर बरडे यांनी केली आहे.