मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा : १ ऑक्टोबरला पहाटे टँकर कारला घासल्याने टँकर चालकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत टँकर चालकाचा मृत्यू झाला होता. नायगांवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी या हत्येप्रकरणी चारही आरोपींना अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील रामकिशोर बद्रीप्रसाद कुशवाह (४०) हा १ ऑक्टोबरला पहाटे आपल्या ताब्यातील गॅस टँकर घेऊन मुंबई अहमदाबाद महामार्गावरून एसपी ढाबा, फॅमिली रेस्टॉरंट बार अॕण्ड लॉजिंग, मालजीपाडा येथील सर्वीस रोडवरुन जात होता. यावेळी शेजारून जात असलेल्या मारूती कंपनीच्या कार क्रमांक एम एच ४८ सी के ३७३९ कारला ओव्हरटेक करताना टँकर घासला होता. कारमधील चार अनोळखी व्यक्तींनी त्याचा टँकर रस्त्यात थांबवून रामकिशोर याला शिवीगाळ करत दगडाने टँकरची काच फोडली होती. तसेच त्यांनी ठोश्याबुक्कानी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सरोज कुशवाह यांनी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हयाचे तपासाचे अनुषगांने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयात संशयित आरोपी सबॅस्टीअन कृष्णा वालतुपरमबिल (५३), उत्सव ब्रिाजकिशोर शर्मा (२५), विकी अशोक बारोट (२३) आणि विवेक महेंद्र पवार (३०) या चौघांना नालासोपाऱ्याच्या पूर्व विभागातून ताब्यात घेतले. चौघांकडे चौकशी केली असता त्यांचा गुन्हातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. रामकिशोर कुशवाह यांचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर गुन्हयामध्ये कलम ३०२ हे वाढविण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पदमजा बडे, नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, रोशन देवरे, मनिषा पाटील, पोलीस हवालदार देविदास पाटील, शेखर पवार, सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील यांनी केली आहे.