बोईसर/तलासरी : पालघर जिल्ह्यात विविध तीन घटनांत चौघा जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बोईसर पूर्वेकडील सूर्या नदीत रविवारी बुडालेल्या सुनील संखे (४०) या युवकाचा मृतदेह सोमवारी सापडला असून या घटनेची नोंद बोईसर पोलिसांत करण्यात आली आहे. मूळचा तारापूर एमआयडीसी जवळच्या एकलारे गावचा व सध्या केपी नगर येथे वास्तव्यास असलेला सुनील संखे बोईसर येथून मित्रासोबत रविवारी बोईसर चिल्हार रस्त्यावरील गुंदले येथील सूर्या नदी बंधाऱ्यावर गेला होता. त्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याचे त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी पोलिसांना सांगितले असून अधिक तपास बोईसर पोलीस करीत आहेत. तलासरी तालुक्यातील गिरगाव-डोल्हारपाडा येथील ३५ वर्षीय आदिवासी तरुण संतोष माह्या वांगड हा सोमवारी दुपारी जवळच्या झरी खाडी नदीवर गेला असताना नदीत पडून त्याचा मृत्यू झाला. गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने संजय नदीच्या पाण्यात बुडाला. त्यास गावकऱ्यांनी बाहेर काढून तलासरी ग्रामीण रुग्णालयात आणले, पण त्याचा मृत्यू झाला होता.वाचवायला गेला अन् स्वत:ही बुडालानालासोपारा : पूर्वेकडील तलावात दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रविवारी संध्याकाळी वालीव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातील रेणुकानगरमध्ये राहणारा साहिल मोहम्मद खान (१४) हा त्याच परिसरातील तलावात अंघोळीसाठी शनिवारी दुपारी गेला होता. मात्र साहिलला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. या वेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेला शोएब सलीम शेख (१९) हाही पाण्यात बुडून मृत्यू पावला. या घटनेची माहिती साहिलच्या वडिलांनी वालीस पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहेत.
पालघरमध्ये तीन घटनांत चौघांचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 1:59 AM