हुसेन मेमन, जव्हार
पालघर - मोखाडा तालुक्यातील ब्राह्ममनपाडा येथील अनंता बाळू मौळे यांच्या दुकान व लागून असलेल्या घराला रविवारी रात्री 2.30 वाजता शॉट सर्किट मुळे आग लागली, आग इतकी भयानक होती की काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले यात दुकानातील संपूर्ण माल जाळून खाक झाले तर, घरातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन जण भाजल्यामुळे त्यांना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
ब्राह्ममनपाडा स्टॉप येथील अनंता बाळू मौळे यांचे घराला लागूनच होलसेल किराणा मालाचे दुकान होते, त्यात रविवारी रात्री 2.30 च्या दरम्यान अचानक शॉट सर्किट मुळे आग लागली, आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले यात घरात अनंताचे चार मुले, आई व पत्नी असा सात जणांचा कुटुंब राहत होते, आगीत झोपलेल्या वृद्ध आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, मुलगी पल्लवी मौळे वय 15 तर मुलगा कृष्णा मौळे वय 10 या चौघांचा झोपेतच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तर मुलगा भावेश मौळे वय 12 व मुलगी अश्विनी मौळे वय 17 हे दोघे भाजले असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले असून, अनंता मौळे यांना डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना मोखाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.