वाडा : येथील नगरपंचायतीच्या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी चार दिग्गज उमेदवार उभे असून त्यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची मुलगी निशा सवरा तर शिवसेनेकडून माजी आमदार शंकर गोवारी यांची कन्या गीतांजली कोळेकर, शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे संपर्क प्रमुख गिरीश पाटील यांनी बंडखोरी करत आपली मुलगी सायली पाटील हिला कॉग्रेसकडून रिंगणात उतरवले आहे. बहुजन विकास आघाडी कडून अमृता मोरे निवडणूक लढवत असल्याने ही लढत रंगतदार होणार आहे.या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे रथी महारथी निवडणूकीच्या आखाड्यात उतरले असल्याने जनता कोणाच्या पारड्यात मते टाकून कोणाला तारणार आणि कोणाला मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवसेचे वाडा तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांच्या पत्नी सविता पाटील प्रभाग क्र मांक ५ मधून निवडणूक लढवत आहेत. याच प्रभागातून कॉग्रेसचे कार्यकर्ते संतोष रसालकर यांच्या पत्नी पूनम रसाळकर या रिंगणात आहेत. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवेंद्र भानुशाली रिंगणात उतरले आहेत तर भाजपाकडून माजी उपसभापती माधूरी पाटील ह्या निवडणूक लढवत आहेत. भाजपाचे तालुका सरचिटणीस मनिष देहरकर हे आखाड्यात आहेत. त्यांच्या विरोधात कॉग्रेसचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील हेही आखाड्यात आहेत. याच प्रभागातून शेकाप चे तालुका चिटणीस सचिन मुकणे हेही आपले नशीब अजमावत आहेत. बहुजन विकास आघाडीचे अनंत सुर्वे याच प्रभागातून उभे आहेत.
सासू- सून काका - पुतण्या आमणे- सामने
प्रभाग क्र मांक ४ मधून सासू - सूनेची लढाई पहायला मिळणारा आहे. सासू नयना चौधरी यांच्या विरोधात सून कशीष चौैधरी यांच्यात काटेकी टक्कर होणार आहे. प्रभाग क्र मांक १४ मधून भाजपा कडून पुतण्या जयेश थोरात तर शिवसेने कडून काका भरत थोरात रिंगणात उतरले आहेत. काका पुण्याची लढाई चुरशीची होणार आहे. त्यामुळे मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.