मीरा रोड : पावसाच्या सुरूवातीलाच झालेल्या दुर्घटनेत एका मुलाचा बळी गेला. पाऊस पडत असतानाचा भार्इंदर पश्चिमेच्या भोलानगरमध्ये उघड्यावरच असलेल्या मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन तीन घरांना आग लागली. यात एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. तर तिघेजण किरकोळ जखमी आहेत. सुदैवाने गॅससिलींडरचे स्फोट झाले नाहीत. अन्यथा संपूर्ण झोपडपट्टीच कांदिवलीच्या दामूनगरप्रमाणे बेचीराख झाली असती. भोलानगरमधील शंकर मंदिराच्यामागे गल्ली क्रमांक १३ आहे. संपूर्ण गल्लीतील खोल्यांना वीज पुरवठा करणारे दोन मीटर बॉक्स सुरूवातीच्या खोल्यांना लागूनच आहेत. त्यावरील मुख्य स्वीच बोर्ड तर उघड्यावरच आहेत. मंगळवारी पहाटेपासून पाऊस पडत होता. तोच सकाळी साडेनऊच्या सुमारास येथील मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन तीन खोल्यांना आग लागली. येथील दोन खोल्या रामबचन चौधरींच्या आहेत. तर एका खोलीत विश्वकर्मा कुटुंब तर दुसऱ्या खोलीत चौधरी कुटुंब भाड्याने राहते. तर तिसऱ्या खोलीत दशमी गुप्ता (५५) यांचे कुटुंब राहते. विश्वकर्मा यांच्या घराला आग लागली असता घरात एकट्याच असलेल्या सुधा (२६) या गंभीर भाजल्या आहेत. त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. तर गुप्ता कुटुंबातील दशई यांच्यासह त्यांचा मुलगा सोनू (३५) हे किरकोळ भाजले. मात्र सोनूचा मुलगा मोहित उर्फ छोटू (४) गंभीर भाजला. या शिवाय तिसऱ्या खोलीतील सचिन चौधरी (१६) हा भाडेकरु किरकोळ भाजला. आग लागताच परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. रहिवाशांनी त्याआधीच पाचही जखमींना भीमसेन जोशी रुग्णालयात नेले. गंभीर अवस्थेत असलेल्या सुधा व मोहितला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. यात उपचारा दरम्यान मोहितचा मृत्यू झाला. तर सुधाची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. (प्रतिनिधी)
चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू
By admin | Published: June 23, 2016 2:42 AM