मीरारोड - जमीनी घेऊन त्या विकसीत करणार असल्याने एका वर्षात दीडपट फायदा करून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने तिच्या दोन साथीदारांसह मिळून एकाची दिडकोटी रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशा नंतर काशीमीरा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
६२ वर्षीय दत्तात्रय म्हसे हे बदलापूरच्या मांजर्ली भागात राहतात . रेल्वेतुन स्वेच्छा निवृत्ती घेतली असून त्यांची शेती व जमीन आहे . त्यांचे मेव्हणे पंढरीनाथ भोईर हे मीरा भाईंदर मध्ये महसूल खात्यात मंडळ अधिकारी होते . त्यांनी म्हसे यांची ओळख मीरारोडच्या सेंट पॉल शाळे जवळील ओम शांती टॉवर मध्ये पितांबर व पितांबरा नावाच्या बांधकाम कंपनी असलेल्या सुरेखा नारखेडे , मनोज सिंग व योगेंद्र पांडे यांच्याशी करून दिली होती.
त्यावेळी नारखेडे व अन्य भागीदारानी कंपनीच्या विलेपार्ले , नालासोपारा आदी ठिकाणी जमिनी असून त्या डेव्हलप करणार असल्याने पैसे गुंतवल्यास एका वर्षात दीडपट फायदा करून देऊ सांगितले . त्याप्रमाणे २०१३ साली म्हसे यांनी धनादेशा द्वारे दिड कोटी रुपये त्यांना दिले व त्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर पैसे घेतल्याचे लिहून दिले. काही वर्षांनी म्हसे व भोईर यांनी नारखेडे कडे पैसे मागितले असता त्यावेळी तिने म्हसे यांना दिडकोटी व ७५ लाखाचे दोन धनादेश पुढील तारखेचे दिले . मात्र धनादेशची तारीख आली असता नारखेडे हिने म्हसे यांना धनादेश टाकू नका , तुम्हाला पैसे परत करणार नाही असे सांगितले . त्यांना जीवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली.
म्हसे यांनी ठाणे न्यायालयात याचिका केल्या नंतर न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . सुरेखा नारखेडे सह पांडे व सिंग अन्य लोकांना सुद्धा फसवले असून त्यांच्यावर भाईंदर , नवघर , काशीमीरा , बोईसर , मुंबईचे किडवाई मार्ग आदी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे म्हसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे .