- रविंद्र साळवेमोखाडा - तालुक्यातील जांभूळमाथा येथील मीना भास्कर दळवी (५०) या आदिवासी विधवा महिलेची मोखाडा पोस्ट कार्यालयाकडून फसवणूक झाल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. त्यांनी १२ जानेवारी २०१७ रोजी मोखाडा पोस्टात ५० हजार रु पये खात्यात ठेवले होते परंतु त्यांच्या खात्यावरील रक्कम तत्कालिन पोस्ट मास्तर जयराम भोये यांनी परस्पर काढून लंपास केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.पैसे जमा केल्याचा पुरावा म्हणून पिडित महिलेकडे फक्त रक्कम भरल्याच्या स्लीप असून पासबुक मात्र तिने पोस्टात जमा केले आहे. गेल्या अनेक महिन्यापासून त्या पोस्ट कार्यालयाच्या फेऱ्या मारत असून येथील कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देत आहे. या प्रकरणातील आरोपी जयराम भोये हे सध्या वसई येथील पोस्ट कार्यालयात कार्यरत आहे.कुडा-मेडीच्या घरात मोल मजुरीवर आपल्या तीन मुलांसह गुजराण करणाºया या निराधार महिलेच्या घरोत बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे दिवासुद्धा पेटलेला नाही. मला जर माझे पैसे मिळाले नाही तर मी पोस्ट कार्यालयासमोर आत्मदहन करीन असा इशारा तिने दिला आहे.पोस्टमास्तर चौधरींची भूमिकाया विधवा महिलेची आर्थिक फसवणूक झाल्याने ती जेव्हा मोखाडा पोस्टात गेली तेव्हा, पोस्ट मास्तर चौधरी यांनी स्वत:चे नाव सांगतानाही आडेवेढे घेतले. तसेच, वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेतल्या शिवाय मी कोणतीही माहिती देणार नसल्याचे लोकमतला सांगितले. मात्र, नंतर त्यांनी विषयाची माहिती दिली. तसेच मिरारोड मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला असता या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची प्रतिक्रीया तक्रार निवारण अधिकारी अमोल राऊत यांनी दिली.मीना दळवी यांचे पैसे पोस्टात जमा नसल्याने ते त्यांना देऊ शकत नाही. या प्रकरणाचा पंचनामा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. नेगी सर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. - एस. एम. चौधरी, पोस्ट मास्तर
विधवेची पोस्टाकडून झाली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 2:52 AM