जव्हार - जव्हार तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या ओझर या गावी कोरोना रुग्ण आहेत अशी अफवा पसरली आणि आजूबाजूच्या गावपाड्यातील सर्व ग्रामस्थ भयभीत झाले. काही गावकरी गाव सोडून आपल्या शेतावरील झोपडीत राहायला गेले. अशा गावकऱ्यांमध्ये जाऊन काही शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून पथनाट्याद्वारे जनजागृती केली. पंचायत समिती शिक्षण विभाग तसेच समाजकार्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर ठेवून पथनाट्य सादर केले. यात कोरोनाची लक्षणे, आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे, शासन, पोलीस, डॉक्टर, सरकारी कर्मचारी कशा पद्धतीने कोरोनाशी लढा देत आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या पथनाट्यामुळे काही ग्रामस्थांच्या मानातील भीती संपली व ते पुन्हा गावात राहण्यास तयार झाले. या वेळी गावातील आशाताई, अंगणवाडी ताई, सरपंच, ग्रामस्थ तसेच शिक्षकही उपस्थित होते. या पथनाट्यात नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ चर्चगेट येथे शिक्षण घेत असलेल्या सुषमा गवळी, विजया गवळी, रंजना वरखडे तसेच रत्नगिरी सबसेंटर कॉलेजचा विद्यार्थी कमलेश्वर पागी, यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ सोशल वर्क महाविद्यालयाचे अनिल खरपडे, अंकुश वरठा तसेच करिश्मा महाले सहभागी झाले होते.
भयभीत ग्रामस्थ राहायला गेले झोपडीत! एका अफवेचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 1:38 AM