नालासोपारा (मंगेश कराळे) - विरार पोलिसांच्या ताब्यात असलेला चोरी प्रकरणातील आरोपी ८ ऑक्टोबरला वैद्यकीय तपासणीसाठी मनपाच्या जीवदानी रुग्णालयात आणले असताना तो एका पोलिसाला धक्का मारून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या आरोपीला बोरिवली रेल्वे स्थानकातून रेल्वे पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी रविवारी दिली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी ३ ऑक्टोबरला विरार येथील मंदिरात महिलेची पर्स चोरी करणाऱ्या आरोपी मंगेश ऊर्फ मनिष यशवंत पार्टे (४८) याला रविवारी पकडून विरार पोलिसांच्या ताब्यात दिले होते. ८ ऑक्टोबरला आरोपीला रात्री नियमीत वैद्यकीय तपासणी करीता चंदनसार येथील शासकीय रुग्णालयात नेण्यास आलेले असताना पोलीस कर्मचारी चंदनशिवे याच्या हाताला झटका देऊन तो पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतून पळुन गेला होता. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभिर्याने दखल घेऊन आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले. त्या प्रमाणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनने पोलीस पथक तयार केले होते. आरोपी पळून गेल्यानंतर तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गोपनीय माहितीव्दारे शनिवारी दुपारी आरोपी मंगेश पार्टे याला बोरिवली रेल्वे पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्या पथकाच्या मदतीने बोरीवली रेल्वे स्थानक परीसरातून ताब्यात घेण्यात आले.
आरोपीने पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून गेल्यानंतर ९ ऑक्टोबरला ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग चोरली आहे. याप्रकरणी बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या अधिक तपासामध्ये आरोपीने दादर, माहिम, अंधेरी, केळवा इतर रेल्वे स्थानकांमध्ये तसेच चालू ट्रेनमध्ये बॅग लिफ्टींग व मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीवर यापूर्वी खुन व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पुढील कारवाई करीता विरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे म.सु.ब. प्रविण वानखेडे, सागर सोनावणे आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.