डहाणू : वनहक्क व वीज पुरवठ्याबाबतच्या व अन्य मागण्यासाठी श्रमजीवी संघटनच्या हजारो कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर हरिचंद्र उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी धडक मोर्चा काढला होता. सागर नाका ते तहसीलदार कार्यलयावर काढलेल्या मोर्चात सुरेश रेंजड, अनेश सुतार, रवी चौधरी, बारकू दळवी, जानू सांबर, किरण ताई दुमाडा, रुपेश ढोके, सीता ताई घाटाळ, दिनेश पवार आणि हजारो स्त्री पुरु ष सहभागी झाले होते .मात्र श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित आणि विद्युल्लता पंडित उशिरा पर्यंत पोहोचू शकले नव्हते.
तहसीलदार राहुल सारंग यांना शिष्ट मंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांतील मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन महसूल खात्याच्या अखत्यारीत असलेल्या मागण्यांवर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. मुदतीत रेशनींग कार्ड द्यावे, ते न देण्यास जबाबदार असलेल्या अधिकाº्यांवर सेवा कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करावी, पुरवठा विभागात जमा केलेल्या २९१ कार्डधारकांना धान्यपुरवठा करावा, दापचारी येथील घरासाठी दाखल केलेल्या ७७ अर्जावर निर्णय घ्यावा, डहाणू सतीपाडा रस्ता खुला करावा, कैनाडगट न.१२६/८/३ चा ७/१२ उतारा मिळावा, भाग्यश्री दर्शन, श्रॉफ गॅस एजन्सी, डी.जी.पारेख गॅस एजन्सी, ने उज्वला गॅस योजने अंतर्गत मोफत मिळणाऱ्या गॅससाठी लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, कैनाड ग्रा.पं. मधील ढाक पाडा नळ पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित कामे सुरु करावीत, मोड्गाव ग्रामपंचायत मधील इंदिरा आवास योजने मधील लाभार्थ्यांना पैसे मिळावेत, दाभोण ग्रामपंचायत मधील समाज कल्याण योजने मधून मिळणारी भांडी, खुर्च्या लाभार्थ्यांना न मिळाल्याने संबाधितांवर गुन्हे दाखल करावेत, अंगणवाडी मुलांना पुरेसा पोषण आहार मिळत नसल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, बाडापोखरण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून चिंचणी भागाला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, ऐने, दाभोण या प्राथमिक आरोग्य केंद्रावर कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत, विना रीडिंग वीज बिले पाठविण्यात येऊ नयेत ,पेमेंट आॅर्डर भरूनही वीज जोडणी मिळत नसल्याने ती तात्काळ देण्यात यावी, वरोर फिडर वरील लादण्यात आलेले भार नियमन तात्काळ रद्द करण्यात येवून वीज पुरवठा कायम स्वरूपी सुरळीत ठेवण्यात यावा, डहाणू तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात येवून त्याप्रमाणे रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, वगैरे मागण्या करण्यात आल्या आहेत.