वसई : १ फेब्रुवारीपासून कामावरून कमी केल्याने कंत्राटी कामगारांनी सोमवारी सकाळी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. मात्र, आयुक्तांनी निर्णयात कोणताही फेरबदल होणार नाही, असे सांगितले. रोजीरोटीचा आधार टिकून राहावा म्हणून जीवाचा आटापिटा करणाऱ्या कामगारांची यामुळे निराशा झाली.वसई-विरार महापालिकेतील २ हजार ८४४ कंत्राटी कामगारांना सोमवारपासून कायमची रजा देण्यात आली आहे. याप्रकरणी आयुक्तांनी कामगारांच्या ठेकेदारांना तीन महिन्यांपूर्वी आगाऊ नोटीसही बजावली होती. कामगार गेल्या काही दिवसांपासून नोकरी वाचावी, याकरिता अनेक ठिकाणी विनवण्या करीत फिरत होते. पण, कामगारांना नेता नसल्याने त्यांची आज अखेर नोकरी गेली. सोमवारी काही कामगारांनी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. मोर्चेकऱ्यांनी प्रारंभी विरार पोलीस निरीक्षक सुनील माने यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर, दुपारी आयुक्त सतीश लोखंडे यांची भेट घेतली. पण, लोखंडे यांनी निर्णयात कोणताही फेरबदल होणार नाही, असे सांगितल्याने कामगारांची निराशा झाली. (प्रतिनिधी) साफसफाई विभागातूनही सफायासाफसफाई विभागासाठी यंदा बजेटमध्ये १०३ कोटी रुपयांची तरतूद आहे. यामधील अधिकतर खर्च सफाईवर होतो. त्यासाठी ठेका पद्धतीवर मजूर मागविले जातात. याही ठेक्यात ठराविक राजकारणी आणि अधिकाऱ्यांचे वर्चस्व आहे. ठेकेदार मजूरांची पिळवणुक करीत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. आता आयुक्त लोखंडे हे साफसफाई विभागाचीही सफाई करणार आहेत. आवश्यकतेनुसारच मजूर आणि मजूरांना किमान वेतन आणि इतर सोयीसुविधा देणे बंधनकारक करून रचना बदलणार आहेत. त्यामुळे याविभागातील ठेकेदारांचीही सफाई होणार आहे. आकृतीबंधानुसार कर्मचारी संख्या असणे बंधनकारक असल्याने कंत्राटी कामगार कमी करावे लागले. भांडार विभागाऐवजी प्रत्येक विभागवार खरेदी केली जाणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. तसेच विधी सल्लागारांकडून कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बांधकाम परवानगीचे प्रस्ताव तयार केले जाणार आहेत.- सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका
वसई पालिकेवर कंत्राटींचा मोर्चा
By admin | Published: February 02, 2016 1:48 AM