शशिकांत ठाकूर / कासाडहाणू तालुक्यातील भराड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक झाली असून दोन वर्गखोल्या नादुरूस्त झाल्या आहेत. गेल्या चार वर्षापासून शाळा व्यवस्थापन समिती पंचायत समिती शिक्षण विभागाकडे दुरूस्तीची मागणी करत आहे. मात्र त्याकडे सबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या शाळेत इयत्ता पहिली ते आठवी चे वर्ग आहेत. या शाळेत पहिलीत- २४, दुसरीत -३५, तिसरीत- -२६,चौथीत-२४, पाचवीत-३७, सहावीत -४१, सातवीत -२९, आठवीत -३३ असे एकूण २५९ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत एकूण ७ वर्ग आहेत. त्यापैकी १९७१ साली बांधलेल्या जुन्या इमारतीतील दोन खोल्या अति धोकादायक झाल्या आहेत. या जुन्या, कौलारू छत असलेल्या इमारतीची दहा वर्षापासून दुरूस्तीच झालेली नाही. तिचे लाकडी वासे वाकलेले असून छत पडण्याची शक्यता आहे. तर बाजूच्या वर्गाचे पत्रे तुटले आहेत. सात पैकी तीन खोल्या सुस्थितीत आहेत. तर सन २०११ साली बांधलेल्या नविन इमारती मधील दोन खोल्यांचा स्लॅब पावसाळयात गळतो. त्यामुळे बसण्याची मोठी अडचण होते. या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे मागणी केली असल्याचे सचिवांनी सांगितले. या शाळेत ८ वी साठी गेल्या दोन वर्षापासून विज्ञान विषय शिकविण्यासाठी शिक्षकच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शाळेला संरक्षक भिंत नाही तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बोअरवेलचा वापर विद्यार्थी करतात.
भराड शाळेची इमारत धोकादायक
By admin | Published: January 24, 2017 5:28 AM