मीरारोड - मीरारोड आणि नालासोपारा येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल १७ वर्षांनी अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले आहे. आरोपीवर हिंगोली , नांदेड , अमरावती सह मीरारोड व नालासोपारा भागात एकूण १५ गुन्हे दाखल आहेत.
मुकेश नामालाल जैन याचे तुळींज रोड, नालासोपारा पुर्व येथे सरगम गोल्ड नांवाचे ज्वेलर्सचे दुकान होते. २४ फेब्रुवारी २००८ रोजी दागीने पहाण्याचा बहाणा करुन दुकानात प्रवेश करणाऱ्या टोळीने जैन यांना रिव्हाल्वर व चॉपरचा धाक दाखवून मारहाण करुन दुकानातील कॅबीनमध्ये हातपाय बांधुन कोडुन ठेवले. नंतर दुकानातील ४० लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागीने, नोकीया कंपनीचा मोबाईल फोन लुटून नेला होता. नालासोपारा पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी वसंत चांगदेव म्हात्रे , बायणबाई रामराव वाघमारे, कुसुम दिलीप कोरडे, इंदुबाई दत्तराव लोंबणे व दिपक जगदीश रोडा यांना अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. परंतु पाहीजे आरोपी नामे जॉनी ऊर्फ जर्नादन वाघमारे रा. नांदेड हा पोलीसांना गेल्या १६ वर्षां पासून मिळुन येत नव्हता.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर व संवेदनशील गुन्हयातील पाहीजे आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिलेले असल्याने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी उपनिरीक्षक हितेंद्र विचारे सह राजाराम काळे, हनुमंत सुर्यवंशी, अकिल सुतार, साकेत माघाडे, नितीन राठोड असे तपास पथक तयार केले.
गुन्हयाची माहीती घेऊन पथकाने १ महिन्यांपासुन आरोपीचा शोध चालवला होता. शिपाई नितीन राठोड यांना जॉनी ऊर्फ जर्नादन वाघमारे हा नांदेड ऐवजी सध्या भांडेगाव, हिंगोली येथे राहत असल्याची माहीती समजली. पोलीस पथकाने हिंगोली येथे सापळा रचून स्थानिक पोलीसांचे मदतीने फरार आरोपी जॉनी ऊर्फ जर्नादन रामराव वाघमारे ( वय ४३ वर्षे ) ह्याला १२ जुलै रोजी ताब्यात घेतले.
वाघमारे कडे कसून चौकशी केली असता त्याने २००७ मधील मीरारोड भागात सशस्त्र दरोडा टाकला होता असे निष्पन्न झाले. त्या गुन्ह्यात देखील तो पोलिसांना पाहिजे होता. आरोपीला सध्या नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.