वसईतील एका तरुण तरुणीला मौजमजेसाठी कळंब समुद्र किनाऱ्यावर फिरण्याचा उत्साह चांगलाच अंगलट आला आहे. मंगळवारी सायंकाळी हे तरुण तरुणी फिरण्यासाठी आपली स्विफ्ट कार घेऊन समुद्र किनाऱ्यावर गेले होते. रात्रीच्या वेळी त्याच ठिकाणी थांबण्याचा बेत त्यांनी आखल्याने त्यांनी आपली कार किनाऱ्यावरच पार्क केली. मात्र रात्री भरतीच्या पाण्यासोबत कार पाण्यात वाहून गेली. दोघांनी सकाळी आपली चारचाकी जागेवर नसल्याचे पहिले असता ती चारचाकी समुद्राच्या पाण्यात वाहत जाऊन भुईगाव किनाऱ्यावर जाऊन अडकल्याचे दिसून आले.
त्यानंतर याबाबत तात्काळ वसई पोलिसांना, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मागील २० तासांहून अधिक वेळ ही चारचाकी समुद्रात ५०० मीटर अंतरावर तरंगत असून तिला काढण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. मात्र, ढवळत असलेल्या समुद्राच्या पाण्यामुळे कार बाहेर काढणे जिकिरीचे होत असून आज सायंकाळपर्यंत ही कार बाहेर काढण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वसई पश्चिमेच्या विविध किनाऱ्यावर विविध रिसॉर्ट्स आणि लॉजेस आहेत. अनेक जोडपी येथे येत असतात. मंगळवारी रात्री एक तरुण आपल्या मैत्रीणीसह कळंब मघील एका रिसॉर्टमध्ये रात्र घालविण्यासाठी आला होता. त्याने आपली स्विफ्ट ही चारचाकी कळंब समुद्रकिनाऱ्यावर उभी केली होती. बुधवारी सकाळी तो बाहेर आल्यानंतर त्याला आपली न दिसल्याने तो हादरला आणि गाडीचा शोध सुरू झाला. काही वेळाने ही गाडी भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर दिसली. ही गाडी समुद्रापासून आत सुमारे पाचशे मीटर आत तरंगत होती. यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
स्थानिकांनी तात्काळ याबाबत वसई पोलिसांना, अग्निशमन दलाला कळविले असता घटनास्थळी येऊन त्यांच्या चारचाकीला काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. चारचाकी वाळूमध्ये फसली असल्याने तिला बाहेर काढणे जिकिरीचे होत आहे. या गाडीला ट्रॅक्टर, दोरीच्या सहाय्याने कार पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. ही गाडी कळंब समुद्रकिनाऱ्यावर तरुणाने उभी केली होती. ती भरतीच्या पाण्याने वाहून गेल्याचे वसई पोलिसांनी सांगितले.