- मंगेश कराळेनालासोपारा - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विरार येथील जीवदानी देवीचे भाविकांना सुखकर दर्शन मिळावे यासाठी जीवदानी मंदिर ट्रस्टने दिल्लीवरून मागवलेली फ्युनिक्युलर रेल मार्चमध्ये सुरू होणार आहे. यासाठीची अंतिम टप्प्याची तयारी सुरू आहे.विरारच्या ९०० मीटर उंचीच्या डोंगरावर जीवदानी देवीचे मंदिर आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने दररोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मुंबई, भिवंडी, ठाणे, पालघर, नवी मुंबई आदी ठिकाणांवरून येतात. या मंदिराला १४४० पायऱ्या असल्याने वयोवृद्ध, गरोदर महिला, अपंगांना, लहान मुलांना दर्शन घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते किंवा काही जण देवीच्या दर्शनापासून वंचित राहतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन जीवदानी मंदिर ट्रस्टने पावले उचलत दिल्लीवरून फ्युनिक्युलर रेलच्या दोन बोग्या मागविल्या आहेत. यासाठी ३५ कोटींचा अंदाजित खर्च आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून दिल्लीच्या राईट्स कंपनीच्या गाइडलाइन्सनुसार ट्रायल सुरू आहे. मार्चपर्यंत ही रेल सुरू होणार असल्याचे मंदिराचे मॅनेजर नितीन पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मंदिर सरकारी नियमावलीप्रमाणे सुरू आहे. भाविकांच्या तोंडाला मास्क बंधनकारक केला असून प्रत्येकाचे तापमान तपासले जाते आणि सॅनिटायझर लावले जाते. भाविकांना सोशल डिस्टन्सिंगनुसार मंदिरात प्रवेश दिला जातो. ४ ते ५ हजार भाविकांना प्रवेश देण्यात येतो व गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाते. कोरोनापूर्वी मंदिरात दिवसाला १० ते १२ हजार भाविक दर्शनाला यायचे, पण आता भाविकांची संख्या कमी झाली आहे.
फ्युनिक्युलर रेल नेमकी आहे तरी कशी?या रेलच्या दोन बोग्या असून एक बोगी वर तर दुसरी बोगी खाली असणार आहे. एकावेळी एका बोगीतून १०४ भाविक प्रवास करणार आहेत. या रेलचा कंट्रोल मंदिराच्या ठिकाणी असणार आहे. मॅन्युअलसाठी रेलमध्ये एक चालक असणार. ही रेल ५ मिनिटांत वर जाईल आणि ५ मिनिटांत खाली येईल. भाविकांच्या सुखकर आणि आरामदायक प्रवासासाठी ही रेल उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे.