वसई : आजच्या सिमेंट काँक्र ीटच्या जंगलात मुला-मुलींचे बालपण हरवत चालले असून मैदानी तसेच पारंपरिक खेळांची जागा आता कॉम्प्लेक्स तसेच मॉलमधील इनडोअर खेळांनी घेतली आहे. या बच्चे कंपनीला आता मातीत खेळता यावे आणि मुलांना आपले पारंपरिक व जुने मैदानी खेळ व त्याचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी वसई - विरार शहर महापालिका आणि जागरूक नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वसईच्या पापडी - भाबोळा या मुख्य रस्त्याच्या एका लेनवर रविवार, १२ जानेवारी रोजी ‘फनस्ट्रीट’ या कार्यक्रमाचे पहिल्यांदाच शानदार आयोजन केले होते.
रविवारी सकाळी ७ ते ९ दरम्यान झालेल्या या शानदार उपक्रमाचे उद्घाटन महापौर प्रवीण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या समवेत फनस्ट्रीट उपक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर राजीव पाटील उपस्थित होते. महिला, तरुण, मुले - मुली खास करून ज्येष्ठ आणि मुलींचा मोठ्या प्रमाणातील सहभाग पाहून आज येथे भारतीय पारंपरिक खेळ दिवस आहे की काय, असेच वाटत असल्याचे महापौर म्हणाले. हा उपक्र म आपण यंदा प्रथमच राबवला असून तो यापुढे नित्याने राबवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी जवळपास १८ ते २० प्रकारचे पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने लगोरी, पारंपरिक वेशभूषा, नृत्ये, लेझिम, झुंबा डान्स, स्केटींग, बॅडमिंटन, दोरी उडी, चित्रकला, कार्टून, मेहंदी, सारखे नानाविध खेळांचाही समावेश होता. वसई - विरार महापालिका आणि जागरूक नागरिक संस्थेने राबवलेल्या या उपक्रमाला वसईकरांनी भरगच्च प्रतिसाद दिला. यावेळी मंचावर पालिकेच्या वतीने स्थायी सभापती प्रशांत राऊत, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, भरत गुप्ता, सुदेश चौधरी, लॉरेल डायस, प्रकाश वनमाळी, जागरूक नागरिक संस्थेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. मंचावरील सर्व मान्यवरांनी देखील उपस्थितांसह खेळांचा आस्वाद घेतला.या फनस्ट्रीट उपक्रमात जुन्या खेळांचे पुनरुज्जीवन व्हावे आणि जे खेळ काळाच्या ओघात नाहीसे होत आहेत. ते पारंपरिक खेळ पुन्हा एकदा खेळले गेले जावेत. लहान मुलांना या खेळांची माहिती व्हावी, या हेतूने विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. जणू येथे भारतीय पारंपरिक खेळ दिवसच वसईकर साजरा होतो आहे. महापौर प्रवीण शेट्टी, वसई - विरार शहर महापालिका, वसई