मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात भरवण्यात आलेल्या आंबा महोत्सवात चक्क जुगाराचा फड रंगल्याने खळबळ उडाली. पोलिसांना तक्रार केल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले मात्र गुन्हा दाखल झाला नाही. भाईंदर पूर्वेला इंद्रलोक भागातील बाळासाहेब ठाकरे पालिका मैदानात १४ एप्रिल ते १६ एप्रिल असा मँगो मिलेट फेस्टिवल आयोजित करण्यात आला. दीपस्तंभ या संस्थेने आयोजित या आंबा महोत्सव मध्ये कोकण कृषी विभाग व मीरा भाईंदर महापालिका यांचा सुद्धा उल्लेख फलकांवर केला होता.
सुमारे ७० स्टॉल मैदानात लावण्यात आले असले तरी आंब्याचे मात्र तुलनेत नाममात्र स्टॉल होते . अन्य खाद्य पदार्थांसह कपडे, खेळ आदी प्रकार सुद्धा होते. मात्र स्टॉल मध्ये चक्क पैसे लावून जुगार खेळला जात असल्याचे व तेथे गर्दी झाल्याचे पाहून एका नागरिकाने व्हिडीओ काढला. त्या क्लिप मध्ये सर्रास पैसे लावून जुगार खेळवला जात असल्याचे व १०० का हजार असे ओरडून सांगितले जात असल्याचे आढळून आले. १४ एप्रिल रोजी रात्री ११२ क्रमांकावर तक्रार झाल्या नंतर नवघर पोलिसांना त्याची माहिती आली. पोलीस आले पण त्यांना जुगारी सापडले नाही असे सांगितले जाते.
या प्रकरणी व्हिडीओ व्हायरल झाल्यावर आयोजक दीपस्तंभ संस्थेने, दोघा पोलिसांनी येऊन एका खेळावर आक्षेप आल्याचे संगीतल्यानंतर संबंधित खेळ व स्टॉल बंद केल्याचा खुलासा केला आहे. व्हिडीओ मुळे याची माहिती मिळाल्याने संबंधित विशाल शर्मा नामक व्यक्तीवर कारवाई करा असे पत्र नवघर पोलिसांना संस्थेने दिले आहे.
तर पालिका मैदानात उघडपणे जुगार चालत असताना त्याची माहिती आयोजकांना नसल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून अश्या संस्था व लोकांना पालिकेने मैदाने, वास्तू भाड्याने देणे बंद करावे अशी भूमिका जागरूक नागरिकांनी बोलून दाखवली.