नितीन पंडितभिवंडी : भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावातील वसंत दत्तात्रय टावरे यांच्या घरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील २५० ते ३०० जण एकत्र येऊन हा गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. टावरे कुटुंबाला भजन संस्कृतीचा वारसा असल्याने दहा दिवस विविध कार्यक्र मांसह भजनाचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात.
सध्या सर्वत्र विभक्त कुटुंब पद्धती दिसत असताना टावरे कुटुंबीयांनी आपला एकत्र कुटुंबाचा वारसा तब्बल ६० वर्षांपासून जोपासला आहे. त्यातच एक कुटुंब एक गणपती ही संकल्पना आपल्या वडिलांपासून सुरू असून ती आजही कायम ठेवली आहे.विशेष म्हणजे वसंत टावरे हे भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य असून त्यांच्या पत्नी पल्लवी वसंत टावरे या पूर्णा गावाच्या माजी सरपंच राहिल्या आहेत.
दहा दिवस साजरा होणाऱ्या या घरगुती गणेशोत्सवाच्या शेवटच्या रात्री तर माहेरवाशिणी, नातवंडे व पाहुणे एकत्र येतात. या दिवशी तर सुमारे तीनशे ते चारशे हून अधिक कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. हा उत्सव साजरा करतात. त्यामुळे गणेशोत्सवातून आजही एकत्र कुटुंब पद्धतीचा वारसा खºया अर्थाने टावरे परिवाराने जोपासला आहे. टावरे कुटुंबातील महिला दहा दिवस स्वयंपाक करतात.